सामाजिक

सहाय्यक कामगार आयुक्तांच्या गैरकारभाराच्या चौकशीच्या मागणीसाठी संतप्त कामगारांचे मुंडन आंदोलन ; ठेकेदारांशी संगनमत केल्याचा केला गंभीर आरोप

अहमदनगर दि. २६ एप्रिल (प्रतिनिधी) : रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांनी संतप्त होत अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी मुंडन आंदोलन केले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळ अध्यक्ष नितीन कवले व मंडळाचे सचिव तुषार बोरसे यांच्या गैरकारभाराबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हुंडेकरी ठेकेदारांशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. अकरा गंभीर मुद्दे उपस्थित करत सखोल चौकशीसाठी तात्काळ समिती नेमण्याची मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. आठ दिवसाच्या आत समिती न नेमल्यास बेमुदत अर्धनग्न आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील दोन वर्षांपासून वेतन दरवाढीसाठी कामगार न्याय मागत आहेत. फेब्रुवारी महिन्यात यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर अंमलबजावणीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार हुंडेकरी, ठेकेदारांच्या विरुद्ध सुमारे साडेतीन कोटींच्या वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली होती. माञ हुंडेकरी यांनी या वसुलीला विरोध करत बंद पुकारण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी आयोजित बैठकीला आंदोलनाशी व वेतन दरवाढीशी संबंध नसणाऱ्या तथाकथित टोळी प्रमुखांना व एका संघटनेला निमंत्रित करण्यात आले होते. यावर कामगारांनी जोरदार आक्षेप घेतला. वेतन वाढ मागणाऱ्या आंदोलनकर्त्या कामगारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले असे म्हणत संतप्त कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कवले, मंडळाचे सचिव बोरसे व हुंडेकरी यांच्यामध्ये संगनमत सुरू असल्याचा आरोप केला आहे.

ज्या टोळीप्रमुख, संघटना यांचा आंदोलनाशी संबंध नाही अशांना बैठकीसाठी का पाचारण करण्यात आले ?, ज्या कामगारांनी आंदोलन केले आहे त्यांना निमंत्रित का करण्यात आले नाही ?, मागील दोन वर्षांपासून या सर्व घडामोडी सुरू असून देखील आणि न्यायालयाचे आदेश असून देखील आदेशाचा अवमान का केला ?, अंमलबजावणी का केली नाही ?, मंडळाच्या स्वतःच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दोन वर्षांची दिरंगाई का केली ?, वारई, लेव्ही वसुली करण्यात दिरंगाई का करण्यात येत आहे ?, कामगार कल्याणाचे निर्णय का राबवण्यात आले नाहीत ?, हुंडेकरी यांचे प्रत्येक वर्षी लेखापरीक्षण का करण्यात आले नाही ?, माथाडी मंडळाचे अध्यक्ष या नात्याने कायद्यामध्ये तरतूद असल्याप्रमाणे कामगारांच्या हिताची जपणूक का करण्यात आली नाही ? आदी गंभीर बाबींची चौकशीची मागणी कामगारांनी यावेळी केली.

निवेदनाची प्रत राज्याच्या कामगार आयुक्तांना पाठवण्यात आली असून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच त्यांची शिष्टमंडळासह मुंबईत समक्ष भेट घेणार असल्याचे यावेळी किरण काळेंनी सांगितले. कामगार प्रतिनिधी सुनील भिंगारदिवे, विलास उबाळे म्हणाले, कवले यांच्या कार्यकाळात झालेल्या प्रशासकीय, आर्थिक अनियमिततेची चौकशीची झाली पाहिजे. तथाकथित टोळी प्रमुख म्हणजे सर्व कामगार नाहीत. कामगारांनी कोणालाही एजंट नेमलेले नाही. कामगारांना डावलून अन्य कुणाशी हुंडेकर्‍यांनी बेकायदेशीररित्या केलेला करार संगनमत करत ग्राह्य धरू नये. वसुली थांबवू नये.

न्यायासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. माल धक्क्यावरून सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्नधान्य, शेतकऱ्यांसाठी खते पुरवली जातात. कामगारांचे पैसे बुडवण्याच्या हेतूने प्रशासन, कामगार, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना बेकायदेशीररित्या बंद पुकारून वेठीस धरणाऱ्या हुंडेकरी ठेकेदारांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे