दावल मलिक देवस्थान जमिनीचा ताबा नव्या व्यवस्थापन मंडळाकडे
पत्रकार परिषद घेत नुतन मंडळाची माहिती

कर्जत प्रतिनिधी : दि १७
कर्जत येथील पिर हजरत दावल मलिक देवस्थानच्या १०२ एकर या वर्ग ३ जमीनीचे व्यवस्थापन करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या व्यवस्थापकीय मंडळाला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी मंजुरी दिली असून पूर्वीचे ट्रस्ट बरखास्त केले असल्याची माहिती पत्रकार परिषद घेत संबंधित नुतन मंडळाने दिली आहे. याच जागेसाठी तौसिफ शेख या युवकाने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आत्मदहन केले होते. यात शेख यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता.
या जागेबाबत मुस्लिम समाजाने सातत्याने पाठपुरावा करून सदर जागेच्या व्यवस्थापनासाठी कमिटी स्थापन करून कायदेशीर लढा उभारला होता. सदर लढ्यास यश मिळाले असून असून पिर हजरत दावल मलीक कर्जतच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ नुसार योजनेस मान्यता देत आली आहे. आदेशात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी अर्जदार माजीदखान पठाण यांनी दाखल केलेला अर्ज मंजूर केला असून सादर करण्यात आलेली व्यवस्थापन योजना योग्य, पारदर्शी व सर्व समावेशक असून वक्फ संस्थेचा कारभार पारदर्शीपणे करता येवु शकेल. यासाठी व्यवस्थापन योजनेत आवश्यक किरकोळ तांत्रिक स्वरूपाचे फेरबदल करून योजना मंजूर करण्यात यावी अशा निष्कर्षाप्रत वक्फ बोर्ड पोहचले असल्याचा आदेश दिला आहे.
गुरुवार दि १७ रोजी पत्रकार परिषद घेत पत्रकारांना माहिती देण्यात आली. सदर जागेची लवकरच शासकीय मोजणी करीत सर्वात प्रथम जी मोकळी जागा आहे तिचा विकास करण्याची योजना अंमलात आणली जाईल. यासह याठिकाणी वैद्यकीय विद्यापीठाची योजना कार्यान्वीत करीत आरोग्य व शिक्षण संस्था उभारण्याचा मानस असून याबाबत बॅरिस्टर ओवेसी यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे म्हंटले. तसेच कर्जत-जामखेडचे आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे भव्य स्टेडियम उभारण्याची योजना करीत आहोत. सध्या ६५ एकर शेतजागा शिल्लक असून ती जमीन माफिया पासून वाचविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या जमिनीचा योग्य पद्धतीने विकास करून पीर हजरत दावल मलिक देवस्थानचा योग्य रित्या विकास करण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली. तसेच या जागेसाठी लढा उभारणारा शहीद तौसिफ शेख याच्या कुटुंबियाकडे ही समिती लक्ष ठेवत त्यांचे योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा सर्वाचा प्रयत्न राहील. प्रथमतः मोकळया जागेचा विकास करण्याचा प्रयत्न असून उर्वरित अतिक्रमण झालेली आणि विक्री केलेल्या जमिनीचे कसे आणि काय करायचे ? याबाबत वक्फ बोर्डाच्या निर्देशाप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया राबविली जाईल असे पत्रकार परिषदेत नुतन मंडळाने विशद केले. यावेळी नुतन अध्यक्ष माजीदखान पठाण, उपाध्यक्ष रज्जाक झारेकरी, सचिव समशेर शेख, खजीनदार अमीन झारेकरी तर सदस्य अय्याज बेग, युनुस कुरेशी, रोहीन सय्यद, शकील आतार, शरीफ पठाण, सुफीयान सय्यद, युनुस पठाण आदी उपस्थित होते.
****** कर्जत प्रशासनाचे असहकार्य – समशेर शेख
कर्जत येथील गट नंबर ७५७ पिर हजरत दावल मलिक देवस्थानच्या जागेबाबत वक्फ बोर्डाने वारंवार पत्रव्यवहार करून निर्देश दिले होते. मात्र याकडे प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी सपशेल जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले. आपले तत्कालीन अधिकारी-कर्मचारी अडकण्याची शक्यता असल्याने यासह या देवस्थान जमिनीतील इतर हक्कातील नावे कमी करण्यास असमर्थता दाखवीत असल्याचा आरोप समशेर शेख यांनी पत्रकार परिषदेत केला. लवकरच याबाबत उपोषण आणि आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल असा इशारा नुतन प्रशासकिय मंडळाने दिला.