जिल्हयातील न्यायालयांमध्ये शनिवार,12 मार्च रोजी राष्ट्रीय लोकदलाचे आयोजन
अहमदनगर दि 17 (प्रतिनिधी) – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, 12 मार्च,2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करून अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होऊन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष न्यायमूर्ती सुधाकर यार्लगड्डा यांनी केले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखल पूर्व प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहे. लोकअदालत आभासी पद्धतीद्वारे देखील आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार बरीच प्रकरणे आभासी पद्धतीने हाताळण्यात येतील. तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या बऱ्याच पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. आपापसातील वाद समझोत्याने मिटवणे यासाठी या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बरीच प्रकरणे आभासी पद्धतीने हाताळण्यात येतील. प्रत्यक्ष उपस्थित होणाऱ्या पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 320 नुसार तडजोड करणे योग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे तसेच बँक व मोटार वीज कंपनीची दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहे.
महानगर पालिका व ग्रामपंचायतीची करवसुली प्रकरणेसुध्दा लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती येथे संपर्क साधावा. पक्षकारांनी आपली प्रकरणे समझोत्याकरिता ठेवून ती सामंजस्याने सोडवण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.