सेतु केंद्रचालकांनी नियमाप्रमाणे दाखल्यासाठी शुल्क आकारावे – प्रांताधिकारी डॉ थोरबोले
अवाजवी रक्कम आकारणाऱ्या केंद्र चालकांना दणका दंडात्मक कारवाईचा इशारा

कर्जत प्रतिनिधी : दि १७
आपले सेवा केंद्र व सर्वसामान्य सेवा केंद्र यांच्याद्वारे वितरीत केले जाणारे सर्व दाखले योग्य आणि शासकीय दरपत्रकानुसारच द्यावे. दाखल्यासाठी अवाजवी रक्कम घेण्यात येऊ नये अन्यथा संबंधित केंद्रावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला.
कर्जत-जामखेड उपविभागातील सर्वच आपले सेवा केंद्र व सर्वसामान्य सेवा केंद्र यांची दि २० जाने रोजी दुरचित्रवाणीद्वारे बैठक पार पाडली. सदर बैठकीत सर्व सेवा केंद्र चालकांना निर्देश देण्यात आले आहेत की, सर्वसामान्य नागरिकांना शासनाने निश्चित केलेले दरपत्रकानुसार दाखल्याची रक्कम आकारणी करने आवश्यक राहील. सदर दरपत्रक सर्व केंद्रचालकांनी प्रथमदर्शनी लावणे बंधनकारक राहील. यासह सदर दरपत्रकाप्रमाणे संबंधीत संचालक दाखल्यांसाठी रक्कम आकारणी करावी. त्याप्रमाणे रक्कम घेत नसल्याचे आढळून आल्यास संबंधीत केंद्रचालकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशारा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिले आहे. खातेदारांनी ७/१२ उताऱ्यासाठी २४ रुपये, सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वय अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र प्रत्येकी ३४ रुपये आकारणी निश्चीत असून या वितिरिक्त केंद्रचालक जास्त रकमेची मागणी करीत असल्यास संबंधित तहसील कार्यालय येथे लेखी तक्रार करावी. जेणेकरून त्या केंद्रावर निश्चित दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही थोरबोले यांनी दिली. यासह दर महिन्याला मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सर्वच केंद्रचालकांची तपासणी केली जाईल असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.