देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: नवीदिल्ली/मुंबई दि.27 – बुध्दगया मंदिर कायदा 1949 बिहार सरकारने रद्द करुन महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौध्दांच्या ताब्यात द्यावे असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत मंजुर करण्यात आला अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज दिली.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे.महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात मिळविण्याचा ना.रामदास आठवले यांनी निर्धार केला असुन त्यासाठी दि.28 मार्च पासुन 3 दिवस ना.रामदास आठवले बुध्दगयेत ठाण मांडणार आहेत.बुध्दगया मंदिर कायदा रद्द करण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करणार असल्याबद्दल ना.आठवले यांच्या पाठिशी संपूर्ण देशभरातील रिपब्लिकन पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे सांगत त्यांच्या बुध्दगया दौऱ्याला यश लाभो अशा शुभेच्छा रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत ना.रामदास आठवले यांना देण्यात आल्या.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत नवी दिल्ली येथे झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत देशभरातील रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
देशभरात येत्या वर्षभरात रिपब्लिकन पक्षाचे एक कोटी सदस्य जोडावेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या तालुका; जिल्हा ;राज्य सर्व कार्यकारणी मध्ये दलित आदिवासी सोबत,ओबीसी,अल्पसंख्याक आणि सवर्णं जातसमुहांच्या कार्यकर्त्यांचा समावेश करावा. रिपब्लिकन पक्ष हा सर्व जातीधर्मीयांचा पक्ष आहे असा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी सर्व जातीधर्मांना रिपब्लिकन पक्षाशी जोडण्याचे निर्देश ना.रामदास आठवले यांनी या बैठकीत दिले.
दलित आदिवासी आणि ओबीसीना खाजगी क्षेत्रात शिक्षण आणि नोकरीत आरक्षण लागू करावेत असा महत्वाचा ठराव या बैठकीत मंजुर करण्यात आला अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा