ज्ञान, विज्ञान व कौशल्य विकासातून ग्रामीण प्रगती शक्य – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन लोणीत संपन्न

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :शिर्डी, दि.10 – ग्रामीण विकासाचा निर्देशांक १२ टक्क्यांवरून २६ टक्क्यांवर नेण्यासाठी शिक्षणासोबत विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर भर देणे अत्यावश्यक आहे. जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि सौरऊर्जेसारख्या उपाययोजनांनी ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
लोणी येथे स्वर्गीय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार सर्वश्री शिवाजीराव कर्डीले, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. विठ्ठलराव लंघे, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ. अमोल खताळ, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सौ. शालिनी विखे पाटील, सौ. सुवर्णा विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, आदीउपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांचे कार्य प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवायचे असेल तर विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. शेतीच्या व्यवस्थेत मूलभूत सुधारणा केल्यास शेतकरी आत्मनिर्भर बनतील. विदर्भातील जलसंधारणामुळेच शेतकरी उर्जादाता बनत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “रासायनिक खतांमुळे जमीन खराब होत आहे. सेंद्रिय शेतीला आणि सौरऊर्जेला प्राधान्य द्यावे लागेल. दुग्ध व्यवसायासाठी नवे वाण वापरल्यास शेतकऱ्यांना नवा मार्ग मिळू शकतो. ग्रामीण-शहरी दरी मिटवण्यासाठी रस्त्यांचा विकास आणि जलसंधारण ही दोन महत्त्वाची शस्त्रे ठरतील.”
जिल्ह्यातील रस्ते योजनांबाबत गडकरी म्हणाले की, “नांदूर शिंगोटे, सिन्नर आणि सुरत-चेन्नई मार्गांसह जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील. त्यासाठी स्थानिकांना खर्च करावा लागणार नाही. या कामांबरोबरच जलसंधारणाच्या उपक्रमांनाही आमच्या मंत्रालयाकडून मदत दिली जाईल.”
गडकरी म्हणाले, “लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकारातून शैक्षणिक प्रकल्प उभारून ग्रामीण भागात परिवर्तन घडवले. त्यांचे आत्मचरित्र म्हणजे सामाजिक बांधिलकी आणि त्यागाचे प्रतिबिंब आहे. देशात सध्या विचारशून्यता ही मोठी समस्या बनली असून, अशा स्वच्छ विचारसरणीच्या नेतृत्वाची गरज आहे.”
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र म्हणजे पन्नास वर्षांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. त्यांच्या नावाने राष्ट्रीय स्तरावर सहकार, कृषी, शिक्षण आणि जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गडकरी साहेबांनी स्वीकारली आहे.
कार्यक्रमात माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. राज्यभरातून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.