कोविड-19 तिस-या लाटेच्या उपाय योजनांचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
कोविड प्रतिबंधक उपाययोजनाबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक
कोविड-19 तिस-या लाटेच्या उपाय योजनांचा
जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
अहमदनगर (प्रतिनिधी) दि. 04 – कोविड – 19 च्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज घेतला. कोविड प्रतिबंधक उपाययोजनाबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. रामटेके, महानगरपालिकेचे वैद्यकिय अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्या कामकाजा संदर्भात माहिती घेऊन तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण आणि कोविड चाचणीचे प्रमाण वाढविण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या. दवाखन्यात उपलब्ध असलेले बेडची संख्या, कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांची चाचणी करावी अशा सूचना दिल्यात.
तालुक्यातील कोविड सेंटरची संख्या वाढविण्याबाबत व त्यातील सोयी सुविधांचे नियोजन करावे. कोविड सेंटरमध्ये औषधांचा साठा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. या सर्व कामांच्या निरीक्षणासाठी निरीक्षण म्हणून एका अधिका-याची नेमणूक करावी. तसेच लसीकरण वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक यांना लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्यावे. जास्तीत-जास्त लसीकरण व चाचण्या कशा होतील याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. लसीकरण व कोविड चाचण्या वाढविण्यासाठी आपल्या अधिकारात जे-जे निर्बंध लावण्यात येतील ते लावा. ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करा. कोविड सेंटरमध्ये स्वच्छता, गरम पाणी सुविधा, लाईट, ऑक्सिजन बेडची व्यवस्था आणि आय.सी.यु. कक्षाची व्यवस्था तसेच प्राथमिक गरजा लक्षात घेऊन नियोजन करा. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण यावर सुध्दा लक्ष केंद्रित करुन लसीकरणाचा वेग वाढविण्याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित आरोग्य व प्रशासकीय यंत्रणांना यावेळी दिल्या.