निधन

आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. रंजनाताई जोगेंद्र कवाडे यांचे निधन जयदीप कवाडे यांना मातृशोक आज मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 21 फेब्रुवारी:आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक, शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. रंजनाताई कवाडे यांचे शनिवारी, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.१० वाजता नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांना मातृशोक झाला आहे. त्या लाँग मार्चचे प्रणेते, पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी होत.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती; मात्र आजाराशी झुंज देताना त्यांनी मानसिक धैर्य आणि सकारात्मकता कायम ठेवली होती. प्रा. रंजनाताई कवाडे या केवळ एका राजकीय कुटुंबातील सदस्य नव्हत्या, तर स्वतःच्या विचारांवर ठाम राहून कार्य करणाऱ्या मार्गदर्शक होत्या. त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना आणि राष्ट्रीय विद्यार्थी सेनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. विविध सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, युवक संघटनांचे मार्गदर्शन आणि आंबेडकरवादी विचारांचा प्रसार यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. त्यांच्या पश्चात मुलगा जयदीप, मुलगी वैशाली, मुलगी सुजाता, सून प्रतिमा, नात निरिजा, नात अस्मिता तसेच नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. प्रा. रंजनाताई कवाडे यांची अंत्ययात्रा आज शनिवारी, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता नागपुरातील लक्ष्मीनगर येथील निवासस्थानातून निघून मोक्षधाम घाट येथे जाणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे