देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : राहुरी, दि. 15 जुलै : ग्रामीण भागातील तीव्र पिण्याच्या पाण्याच्या टंचाई, जलजीवन मिशन योजनांची रखडलेली कामे आणि प्रशासनाच्या आश्वासनपूर्तीतील अपयशाच्या निषेधार्थ पाणी हक्क संघर्ष समिती, राहुरी यांच्या वतीने दि. २० जुलै २०२६ रोजी “भीक मागो आंदोलन” करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली आहे.
समितीच्या वतीने सांगण्यात आले की, दि. २२ जून २०२६ रोजी राहुरी पंचायत समिती व तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी वावरथ, चिंचाळा, बुळे पठार, वरशिंदे, चिखलठाण, जांभळी व सात्रळ या गावांतील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत संबंधित ग्रामसेवकांकडून प्रस्ताव मागवून घेण्यात आले असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, अनेक दिवस उलटूनही या प्रस्तावांवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसून नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांतील कामे निधीअभावी बंद असल्याचे कारण प्रशासनाकडून सातत्याने दिले जात आहे.
दरम्यान, जलजीवन मिशनमधील गैरव्यवहारांच्या प्रकरणात काही अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. तसेच या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनाही भूमिका घ्यावी लागली आहे. तरीदेखील प्रत्यक्षात रखडलेल्या योजना सुरू होत नसल्याने ग्रामीण जनता तीव्र संताप व्यक्त करत आहे.
याच पार्श्वभूमीवर, “सरकारकडे जर ग्रामीण भागाला पिण्याचे पाणी देण्यासाठी निधी नसेल, तर आम्ही जनतेकडून भीक मागून तो निधी सरकारला पाठवू” या प्रतीकात्मक भूमिकेतून “भीक मागो आंदोलन” करण्यात येणार आहे. या आंदोलनातून राज्य सरकारचे लक्ष ग्रामीण भागातील पाणीटंचाईकडे वेधून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनात नागरिक, शेतकरी, महिला, युवक, सामाजिक संघटना आणि सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पाणी हक्क संघर्ष समिती, राहुरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्य मागण्या :
-रखडलेल्या पिण्याच्या पाणी योजनांना तात्काळ निधी उपलब्ध करावा.
-जलजीवन मिशनची बंद असलेली कामे तात्काळ सुरू करावीत.
-गैरव्यवहार करणारे अधिकारी ज्या प्रमाणे निलंबित करण्यात आले त्याच प्रमाणे कामाचे ठेकेदार आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.
-ग्रामीण नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
– निवेदन सादर करतांना निखिल साळवे, देवराम जाधव, आयु.मधुकर विधाटे, श्रीराम विधाते, रावसाहेब बर्डे, आदित्य साळवे, अक्षय बर्डे , डॉ जालिंदर घिगे इ पाणी हक्क संघर्ष समिती, राहुरी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा