राजकिय

सक्कर चौक ते काटवन खंडोबा चौक रस्ता आता “माजी आमदार स्वर्गीय अरूणकाका बलभिमराव जगताप (काका) मार्ग” या नावाने ओळखला जाणार महापालिकेचा ठराव मंजूर; नागरिकांच्या मागणीला अधिकृत शिक्कामोर्तब

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 25 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्र. 13 मधील सक्कर चौक ते काटवन खंडोबा चौक या महत्त्वाच्या रस्त्याचे नामकरण “माजी आमदार स्वर्गीय अरूणकाका बलभिमराव जगताप (काका) मार्ग” असे करण्यास महापालिकेने अधिकृत मंजुरी दिली आहे. याबाबतचे नामकरण पत्र महापौर ज्योतीताई गाडे व उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते यांना प्रदान करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक निखील वारे, सुरेश बनसोडे, पै. महेश लोंढे, जितू गंभीर, राजेंद्र पडोळे, धनंजय गाडे, अभिजीत बोरुडे, प्रशांत धाडगे, राहुल कातोरे, गणेश कोल्हे, अनमोल वाडेकर, विवेक गायकवाड यांसह मान्यवर उपस्थित होते.
शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीत मोलाचे योगदान देणारे माजी आमदार स्वर्गीय अरूणकाका बलभिमराव जगताप (काका) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संबंधित रस्त्याला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांनी केली होती. ही मागणी प्रा. माणिक विधाते व राजेंद्र पडोळे यांच्या माध्यमातून महापालिकेकडे सादर करण्यात आली होती.
निवेदनात नमूद करण्यात आले होते की, स्वर्गीय अरूणकाका जगताप यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द याच परिसरातून सुरू झाली होती. त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी आणि पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी या रस्त्याला त्यांचे नाव देणे योग्य ठरेल. नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचा या मागणीला मोठा पाठिंबा लाभला.
महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार रस्ते, चौक व सार्वजनिक स्थळांना नावे देण्याबाबत आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मानक कार्यपद्धती (S.O.P.) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार संबंधित विभागाने प्रस्ताव सादर केला. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार महासभेच्या अधिकाराचा वापर करून मा. प्रशासकांनी हा ठराव मंजूर केला. महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ‘ड’, प्रकरण 11 व 29 तसेच स्थायी आदेशातील कलम 457 नुसार रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणांना विशिष्ट नावे देण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे. या सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता करत “सक्कर चौक ते काटवन खंडोबा चौक” या रस्त्याचे नामकरण अधिकृतपणे “स्वर्गीय अरूणकाका बलभिमराव जगताप (काका) मार्ग” असे करण्यात आले आहे.
प्रा. माणिक विधाते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अरूणकाका जगताप हे अहिल्यानगरच्या विकासाचा पाया होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जनतेसाठी सातत्याने कार्य केले. त्यांच्या स्मृतीतून आजही शहरात विकासाची प्रेरणा जिवंत आहे. “या मार्गाला त्यांचे नाव देणे हा केवळ सन्मान नसून, आपल्या शहराचा अभिमान आहे,” असे ते म्हणाले. तसेच लवकरच या मार्गावरील नामफलकाचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे