दिनविशेष

संविधान दिन विशेष भारताचा राष्ट्रीय ग्रंथ संविधान

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 26 नोव्हेंबर : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते.
” लोकांच्या सामाजिक, आर्थिक जीवनात रक्ताचा एक थेंबही न सांडता क्रांतिकारी परिवर्तने आणता येतील अशी शासन प्रणाली म्हणजे लोकशाही,” अशी लोकशाहीची व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती.
राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक न्याय, आर्थिक न्याय यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र संघर्ष उभा केला, आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. निवडणुकीच्या माध्यमातून आणि आरक्षणाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्रांती संविधानाच्या माध्यमातून केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बॅरिस्टर ही एकमेव पदवी सोडली तर सगळ्या पदव्या अर्थशास्त्रातील आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. अर्थतज्ञ म्हणून संविधान लिहीत असताना एक वेगळा ठसा उमटवलेला आहे.
संपत्तीमुळे माणूस स्वावलंबी होतो. प्राचीन काळी शूद्रांनी आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ नये हा मनुस्मृतीचा आदेश मानवाधिकाराच्या विरोधी होता.
आर्थिक समते शिवाय राजकीय स्वातंत्र्याला महत्व उरणार नाही कारण सुरक्षा व संरक्षणाची हमी देणारे आर्थिक स्वातंत्र्य नसेल. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत आर्थिक न्यायाचे तत्व देताना देशाच्या विकासात सत्ता व शासनात भागीदारी देण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय समाजाची शिफारस केली आहे. जेेव्हा शासन प्रशासनात या वर्गाचे प्रमाण वाढेल तेव्हाच आर्थिक समानता निर्माण करणे शक्य आहे.
शूद्र( ओबीसी) अतिशूद्र( अनुसूचित जाती जमाती) आदिवासी, महिला आणि सवर्ण समाज हे राजकारणात समान अधिकारी होतील तेव्हाच चार्तुवर्ण्य जन्य विषमता आपोआप धुळीस मिळेल. मागासवर्गीयांच्या जीवनात संविधानिक रीतीने सामाजिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी आरक्षणाशिवाय दुसरे कोणते माध्यम होते? हे संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठासून सांगितले.
पहिली गोलमेज परिषद ही भारताच्या संविधानाविषयी विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण धोरणाचा जोरदार पुरस्कार केला. मागासवर्गीयांच्या गुलामीच्या संबंध भारताच्या भावी स्वातंत्र्याशी , संविधानाशी जोडला. समान नागरीकत्व, मूलभूत अधिकार, अन्याय अत्याचारापासून मुक्तता, भेदभाव विरुद्ध संरक्षण, सर्व मागास जाती-जमातींना विधान मंडळामध्ये पुरेशे प्रतिनिधित्व, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व करण्यात यावे अशा मागण्यांचा जोरदार पुरस्कार केला.
गोलमेज परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणी सोबत 16 जानेवारी 1931 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात” देशातील एखादी नोकरी एकाच जातीची मिरासदारी होऊन बसली तर, देशाच्या सार्वजनिक जीवनात धोका होऊन बसेल असे मला वाटते.” अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गोलमेज परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य वर्गाकरिताच आरक्षण मागितले नाही तर उच्च वर्णी यांची मक्तेदारी संपवून मागासवर्गीय जातींना योग्य व समाधानकारक वाटा देण्याची मागणी केली.
सामाजिक न्याया इतकाच आर्थिक न्यायाचा लढा तेवढाच महत्त्वाचा आहे. भारतीय संविधानात लोकशाही एक राजकीय व्यवस्था म्हणून स्वीकारली असली तरी, आपले ध्येय हे आर्थिक लोकशाहीचे आहे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शक तत्त्वाच्या चर्चेचा समारोप करताना संविधान सभेत निघून सांगितले.
भारतीय समाज व्यवस्था हे सामाजिक दृष्टीने विषमतेचे माहेरघर आहे. विषम समाज रचनेत समानता प्रस्थापित करण्यासाठी प्रतिनिधित्वाचा म्हणजेच आरक्षणाचा हक्क हाच खरा समतेचा हक्क होऊ शकतो.
संविधान निर्मितीच्या काळात आरक्षणावरून तुफान वादळ उठले होते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समर्थ लेखणीने व अभ्यासपूर्ण वाणिने त्यांना प्रत्युत्तर दिले. बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात” समतेसाठीच विषमता” या लेखात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ” समता वाद्यांचे ध्येय सर्वांना समतेने वागवून चालणे शक्य नाही, जेथे सर्व व्यक्ती समान आहेत, काही व्यक्तींना असमानतेने वागविल्यास विषमता उत्पन्न होईल. पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारखे लेखून चालणे म्हणजे समता प्रस्थापनेच्या ध्येयाला विरोध करणे होय.
आर्थिक न्याय अर्थात आर्थिक लोकशाहीच्या संदर्भात 22 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ” जे लोक सरकार बनविणार आहेत त्यांच्यापुढे भारतीय संविधान एक आदर्श ठेवू इच्छिते, हा आदर्श आर्थिक लोकशाहीचा असेल.
सामाजिक न्याय, आर्थिक न्याय यांचे प्रतीक म्हणजे भारताचे संविधान आहे. संविधान हा राष्ट्र निर्मितीचा, देेशाच्या संपन्नतेचा, समृद्धीचा राष्ट्रीय ग्रंथ आहे

 शब्दांकन :भिमराव जयवंत गाडे
9273574441

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे