दिनविशेषब्रेकिंग

पुरूष सगळीकडेच “दीन” महिलांचे संरक्षण कायदे “ढाल” कि “तलवार”. ॲड शिवाजी अण्णा कराळे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दि. 19 नोव्हेंबर :नमस्कार मित्रांनो, 19 नोव्हेंबर हा जागतिक पुरूष हक्क दिन आहे. त्या निमित्त सदरचे विवेचन करावे वाटते. सर्व सामान्य जनतेला पूर्वीचे जुने कायदेच अजुन माहीत आहेत म्हणूनच त्याच कायद्याचा उल्लेख सदर अर्टिकल मधे केलाय .
आपला भारत देश पुरूष प्रधान असला तरीही भारताला आपण “भारतमाता” म्हणतो. जगामध्ये असा एकच देश आहे ज्याला गर्वाने भारतमाता म्हणून संबोधलं जाते. राजमाता जिजाऊ माॅ साहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,  रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, पहिल्या महिला शिक्षिका आदरणीय  सावित्रीबाई फुले, चाॅदबिबी, मदर तेरेसा, माता रमाबाई आंबेडकर, फातिमा बीबी या आणि अशा कितीतरी महान महिलांचा आदर्श आजही मोठ्या भक्तिभावाने जपला जातोय. खरं तर महिला भगिनींनी या महान महिलांचा आदर्श ठेवलाच पाहिजे. आपला भारत देश हा लोकशाही माननारा देश आहे. त्यामुळे  घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधान आणि लोकसभा व राज्यसभेतील कायदे मंडळाच्या वतीने जे कायदे आहेत त्याचे पालन करणे ही सर्व भारतीय जनतेची जबाबदारी आहे. देश स्वतंत्र झाल्यावर महिलांना संरक्षण मिळावे म्हणून अनेक कायदे निर्माण केले. आणि महिलांना संरक्षण कवच दिले. शहाबानो केस प्रकरणापासुन जर एखाद्या महिलेला तिचा पती नांदवत नसेल तर तीला क्रिमीनल प्रोसीजर चे कलम 125 प्रमाणे नव-या कडून खावटी किंवा पोटगी मागण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. तसेच एखाद्या महिलेच्या सासर कडील मंडळी तिचा विनाकारण छळ करीत असतील व पैशाची मागणी करत असतील तर ती महिला भा.द.वि. कलम 498 प्रमाणे तिच्या सासरच्या मंडळी विरूध्द गुन्हा दाखल करू शकते. तसेच आता सरकारने महिलांना अजुन जास्त संरक्षण मिळावे म्हणून “डोमॅस्टीक व्हायोलेशन ॲक्ट 2005” हा कायदा पारित केला आहे. हा सगळा उहापोह करण्याचा उद्देश एकच आहे की, आपल्या देशात महिलांना कडे अजुनही “अबला नारी ”  म्हणूनच पाहिले जाते. वास्तविक पाहता आज महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. शासकीय, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमठवला आहे. भारतात पंतप्रधान पदापासुन राष्ट्रपती पदापर्यंत महिला त्यांचे कर्तृत्वाने पुढे आलेल्या आहेत. तरीही आपण अजुन सुद्धा महिलांना अबला म्हणून संबोधतो. वास्तविक आता महिला अबला नसुन सबला झालेल्या आहेत. एक गोष्ट मात्र निश्चितच आहे की काही ठिकाणी महिला भगिनींना चांगली वागणूक दिली जात नाही व त्यांचेवर काही नराधम अत्याचार करतच आहेत. मुलगी अगदी स्वतःच्याच घरात सुद्धा सुरक्षित नाही याची अनेक उदाहरणे घडलेली आहेत. सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे जवळच्या नातेवाईकांकडूनच अनेक ठिकाणी महिलावर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महिला भगिनींना सुरक्षितता मिळावी म्हणून त्यामुळे सरकारने महिलांना संरक्षण मिळावे म्हणून अनेक कायद्याची “ढाल” दिली आहे. त्यामुळे शासनाचे आभारच मानले पाहिजेत. कारण कोणालाही वाटते की, आपल्या घरातील महिला भगिनीं सुरक्षित राहिली पाहिजे, आणि त्यात वावगे काहीच नाही.  परंतु जसजसे महिला सुशिक्षित झाली आणि घराबाहेर पडू लागली, नोकरी, व्यवसाय करू लागली आणि स्वकमाई ची रक्कम तिच्या हातात येऊ लागली  तेव्हा तिच्या मनात सुद्धा “इगो” प्रोब्लेम निर्माण झाला. मग तिच्या सुद्धा स्वतंत्र स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्यासाठी इच्छा पल्लवीत झाल्या.अर्थात महिलांनी स्वतःच्या इच्छे प्रमाणे जीवन जगण्यात वावगे काहीच नाही. पण काही काही महिला लग्नाच्या नंतर घरातील सासुसासरे यांना “डस्टबीन” समजायला लागल्या व लगेच पतीला घेऊन वेगळे रहायला लागल्या. त्यामुळे घराचे घरपण नाहीसे झाले. मग संसारात भांडण तंटा व्हायला लागले आणि प्रकरणे घराचे उंबरठे ओलांडून कोर्टात आणि पोलिस स्टेशनला जायला लागली. लग्नाच्या नंतर चार पाच महिने सुद्धा संसार कसाबसा होऊ लागल्याने अनेक जण घटस्फ़ोट घेण्यापर्यन्त गेले. या सगळ्या गोष्टी पहाता एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की, ॲडजस्टमेंट   करायला कुणीच तयार नाही. मग  काही महिलांनी विनाकारण सासुसासरे आणि नवरा यांना कायद्याचा धाक दाखवून वेगवेगळ्या स्वरूपात गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. वास्तविक पाहता ” घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं, एकानी पसरविलं तर दुस-यांनी आवारायचं असतं ” ही संकल्पनाच राहिली नाही. त्यातच महिलां साठी सामाजिक काम करणा-या काही चांगल्या संघटना व्यवस्थित मार्गदर्शन करतात आणि तुटणारा संसार जोडण्याचा प्रयत्न करतात ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. परंतु काही  संघटना विनाकारण महिला भगिनींना  भडकविण्याचे काम करतात, आणि सासर कडील मंडळी विरूध्द  वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यास प्रवृत्त करतात. आता तर डी.व्ही. ॲक्ट 2005 चा सर्रासपणे दुरूपयोग होताना दिसत आहे. सध्या महिला पोटगी साठी कलम 125 ची केस, भा. द.वि. कलम 498 , डि. व्ही. ॲक्ट 2005 आणि तसेच हिंदू विवाह कायद्यानुसार केसेस चे पुर्णपणे “पॅकेजच” न्यायालयात दाखल करतात. वर्षानुवर्षे कोर्टात चकरा मारतात, आणि नंतर कधी तरी आपसात तडजोड करतात. खरं तर पती पत्नीच्या भांडणात बिचा-या लहान मुलांचे खुपच हाल होतात. वास्तविक पाहता,आपण या कायद्याचा कायदेशीर पणे थोडा जरी विचार केला तरी या मध्ये कुठेही फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली नाही. फक्त केवळ आणि केवळ पुरूषांना अर्थिक आणि शारीरिक व मानसिक त्रास देणे एवढाच उद्देश यात स्पष्ट पणे दिसुन येतो. तसेच एखाद्याची बायको व्यभिचार करत असेल, स्वतंत्र कमाई असेल, स्वतः होउन नांदत नसेल व नव-याचे घर सोडून गेली असेल तर तीला पोटगी मागण्याचा अधिकार नाही अशा स्वरूपाचे अनेक न्याय निर्णय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी दिलेले आहेत. तसेच एखाद्याची बायको वेळोवेळी पतीला व सासुसासरे यांना अपमानास्पद वागणूक देत असेल तर पतीला घटस्फ़ोट मागण्याचा अधिकार सुद्धा आहे. तसेच एखाद्याची बायको नोकरी  करत असेल आणि नवरा काहीच काम धंदा करत नसेल किंवा अपंग असेल तर तो बायको कडून पोटगी सुद्धा मागु शकतो. तसेच बायकोने शारिरीक आणि मानसिक छळ केल्याबद्दल नवरा सुद्धा पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल करू शकतो. असे असले तरी पोलिस प्रशासन सुद्धा महिलांनी पुरूषांचे विरूध्द तक्रार दिली की लगेच नोंदणी करून घेतात, पण एखादा पती आपल्या पत्नीच्या विरोधात तक्रार करायला पोलिस स्टेशन ला गेला तर पोलिस त्याची तक्रार नोंदवून घेत नाहीत हे दुर्दैव आहे. आता तर महिलांनी व्यभिचार केला तरी गुन्हा दाखल केला जात नाही. तसेच तिच्या पहिल्या पती पासुन झालेल्या अपत्याची जबाबदारी दुस-या पतीवर येते अशा कायदेविषयक तरतुदी आहेत.  एकंदरीत पुरूष हा सगळीकडेच “दीन” होत चाललाय. महिलांचे कौतुक करण्यासाठी 8 मार्च हा महिलादिन म्हणून साजरा केला जात आहे. त्याचे स्वागत आहेच, पण कौतुक करण्यासारखे पुरूष या भारतात जन्मलेच नाहित का? मग पुरूष हक्क दिन का साजरा करत नाहीत.  खरंतर सर्व  पुरूषांनी यावर आवाज उठवून सरकारला जाग आणली पाहिजे.
जर कायदा सगळ्यानां समान असेल तर पोलिस प्रशासन यांनी महिला व पुरुष असा दुजाभाव का करावा हाच प्रश्न निर्माण झाला आहे.भरोसा सेल मध्ये सुध्दा पुरुषांवर अन्याय होत आहे. तिथे पण त्याची तक्रार घेतली जात नाहीत. पुरूषांवर झालेल्या अन्यायावरुन अद्याप एकाही महिले विरूध्द तक्रार दाखल झाल्याचे वाचनात येत नाही. आत्ता पर्यंत महिलांनी सासुसासरे आणि नवरा यांचे विरूध्द दाखल केलेल्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याचे प्रमाण सुद्धा फारच कमी आहे. याचाच अर्थ असा की काही महिला विनाकारण सासुसासरे आणि नवरा यांना त्रास देण्यासाठी तक्रारी दाखल करतात आणि कायद्याचा वापर ” तलवार ” म्हणून करतात. काही ठिकाणी तर पुरूष वर्गाला ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत. सिनेमा सृष्टीत असे अनेक अपप्रकार घडतात आणि त्यामुळे काही नटांना आत्महत्या करायची वेळ आली. तसेच आदरणीय भैय्यू महाराज देशमुख यांचे बरोबर सुद्धा ब्लॅकमेलचा प्रकार घडलाच होता. कधी कधी प्रेम प्रकरणातून अशा घटना घडतच असतात. कधी कधी महिलाकडून पुरूषा विरुद्ध लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक शोषण केले, अशाही तक्रारी दाखल करण्यात येतात. पण या तक्रारी मध्ये सुद्धा ब-याच वेळा ब्लॅकमेल करण्याचा हेतू असतो. हे सुद्धा नाकारता येणार नाही. जर खरोखरच जबरदस्तीने हे प्रकार घडत असतील अशा नराधमांना कठोर शिक्षा दिली पाहिजे असे वाटते आहे.  परंतु हे जरी सत्य असले तरीही जवळपास 45% महिला भगिनींना सासरच्या मंडळी कडून विनाकारण त्रास होत आहे हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. अनेक ठिकाणी काही लालची मंडळी महिलांना जाणुन बुजुन त्रास देतात हे सुध्दा नाकारता येणार नाही. त्या नालायक माणसांना शिक्षा झालीच पाहिजेत अशी भूमिका पुरूष हक्क संरक्षण समितीची आहेच.अनेक पुरूषांनी पत्नी व तिच्या माहेर कडील मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. महिला खोटे रडून रडून आपली कहाणी सांगतात, त्यामुळे महिलांचे सांगण्यावर लगेच विश्वास ठेवला जातो., पण पुरूषांना रडता येत नाही त्यामुळे त्यांचेवर समाज विश्वास ठेवायला तयार नाही. सध्याची वाईट परिस्थिती पाहता लग्न पाच पंचवीस वर्षे टिकेल अशी परिस्थिती राहिली नाही. या पुढे पुरूषांनी सुद्धा सावध रहायला शिकलं पाहिजे. काही मुलींना फक्त  नवराच पाहिजे असतो,त्याचे इतर नातेवाईक नको असतात. म्हणून सर्व कुटुंब व्यवस्थाच बिघडते की काय अशी भीती वाटायला लागली आहे. खरोखरच जर महिला भगिनींना त्रास असेल तर त्यांनी बिनधास्तपणे कायदेशीर कारवाई करायला हरकत नाही पण किरकोळ कारणावरून संसार उधळून लावणे योग्य नाही. म्हणून महिला भगिनींनी संरक्षणासाठी असलेल्या कायद्याचा वापर स्वतःच्या संरक्षणासाठी “ढाल” म्हणून करावा पण इतरांना मारण्यासाठी “तलवार” म्हणून करू नये हि विनंती.  
आज पुरूषांवर होणारे अन्याय, अत्याचार याचे कडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. जसा महिलांवर अत्याचार झाले तर त्या महिला आयोगाकडे तक्रार करतात पण पुरूषांवर अन्याय झाल्यास त्याने कुणाकडे तक्रार करायची हा अनुत्तरित प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी पुरूष आयोग व्हायला पाहिजेत. पुरूषांची बाजु खंबीरपणे उचलून घेऊनच नाशिक येथे 1996 मधे पुरूष आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारी पुरूष हक्क संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली. त्या साठी ॲड. धर्मेंद्र चव्हाण, ॲड. बाळासाहेब आकडे,ॲड. बाळासाहेब पाटील डाॅ. सुनिल घाडगे आणि त्यांचे सहकारी कार्यरत आहेत. दिनांक 29.11.26 रोजी परभणी येथे 29 वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न होत आहे. त्याचे आयोजन डाॅ. सुनिल जाधव आणि त्यांचे सहकारी करत आहेत. जागतिक पुरूष हक्क संरक्षण दिनानिमित्त सर्व पुरूषांना न्याय मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
शब्दांकन 
ॲड.शिवाजी अण्णा कराळे
जिल्हाध्यक्ष- पुरूष हक्क संरक्षण समिती शाखा अहिल्यानगर
99 22 545 545

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे