देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क,शिर्डी , दि.7 नोव्हेंबर
राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांच्यासमवेत राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ‘कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना’ कोळपेवाडी आणि ‘सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना’ संजीवनीनगर येथे भेट देऊन ऊसतोड कामगारांशी संवाद साधला. मंत्री श्री. राठोड यांनी प्रत्यक्ष ऊसाच्या फडावर जाऊन ऊसतोडणीच्या कामाचा अनुभव घेतला आणि कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या.
दिवाळीच्या निमित्ताने ऊसतोड कामगारांना शिधा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, तहसीलदार महेश सावंत, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, साखर कारखान्यांचे संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक, इतर अधिकारी, शेतकरी आणि मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते.
ऊसतोड कामगार यांच्या सोबत संवादादरम्यान अनेक ऊसतोड कामगारांची महामंडळाकडे नोंदणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले. यावर नोंदणी अभावी पात्र कामगार शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित महामंडळाच्या माध्यमातून राज्यात विशेष नोंदणी मोहीम राबविण्याबाबत शासन स्तरावर मोहीम राबविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार अत्यंत कष्टाचे काम करतात आणि ते इतर राज्यांतही कामासाठी जातात. त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे असे त्यांनी नमूद केले.
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा व वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास पात्रतेनुसार योजनेतून आर्थिक मदत दिली जाईल.
ऊसतोड कामाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे आणि सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. यावेळी कामगारांना दिवाळीसाठी फराळाची शिधा किट वाटप करण्यात आले.
राज्यातील सर्व कारखाना प्रशासनाने कामगारांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत ऊसतोड कामगारांचे प्रश्न मंत्रिमंडळात मांडणार असून राज्यातील विविध साखर कारखान्यांच्या परिसरात प्रत्यक्ष भेटी देऊन कामगारांच्या समस्यांचे संकलन केले जात आहे. हे सर्व प्रश्न आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून ऊसतोड कामगारांच्या हिताचे ठोस निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य
पावसातील खंडामुळे शेतकरी व कामगारांसमोर निर्माण झालेल्या अडचणी बाबत सांगितले की, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासोबतच जलसंधारणाच्या कामांना गती दिली जाईल. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, नाला खोलीकरण, पाणी अडविणे-मुरविणे आणि सिंचनाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) व इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवले जाईल असे मंत्री राठोड यांनी सांगितले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा