प्रशासकिय

टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी नियोजन करा -जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि 03 नोव्हेंबर : जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच व्यापक नियोजन करावे. जिल्ह्यात जास्तीत जास्त चारा उत्पादन घेण्यावर भर देतानाच उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आणि विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील चारा नियोजनाबाबत आढावा बैठक (दि 02) पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (व्हिसीद्वारे), निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी चारा उत्पादन वाढविण्यासाठी विविध पर्यायांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाणी कमी झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या गाळपेर जमिनीचा चारा लागवडीसाठी उपयोग करता येईल का, याचा संबंधित विभागांनी अभ्यास करावा. तसेच कृषी विभागामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या मिनी किटच्या माध्यमातून आणि बीजगुण केंद्रांच्या सहाय्याने चारा लागवडीचे नियोजन करता येईल का, याची तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
*व्ही.बी.जी. रामजी योजनेतून चारा लागवडीचे प्रकल्प*
व्ही.बी.जी. रामजी योजनेअंतर्गत सामूहिक तसेच वैयक्तिक स्वरूपात चारा लागवडीचे प्रकल्प राबविता येतील का, याचा विचार करून प्रत्येक तालुक्यात असे प्रकल्प हाती घेण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. यामुळे स्थानिक पातळीवर चारा उत्पादन वाढविण्यास मदत होईल. तसेच चारा उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांचा समन्वयाने उपयोग करण्याचेही त्यांनी सूचित केले.
*हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादनाचे प्रात्यक्षिक*
कमी जागेत आणि नियंत्रित पद्धतीने चारा उत्पादन घेण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या जनावरांच्या बाजारात हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादनाचे प्रात्यक्षिक मॉडेल उभारण्याबाबत नियोजन करावे. या माध्यमातून शेतकरी आणि पशुपालकांना या तंत्रज्ञानाची माहिती व प्रत्यक्ष अनुभव मिळेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
*साखर कारखान्यांच्या उपपदार्थांचा पशुखाद्यासाठी उपयोग*
जिल्ह्यातील साखर कारखान्यांमधून उपलब्ध होणाऱ्या बगॅस तसेच मळीचा पुढील वर्षी पशुधनाच्या खाद्यासाठी उपयोग करता येईल का, याबाबतही संबंधित विभागांनी नियोजन करावे. उपलब्ध उपपदार्थांचा योग्य पद्धतीने वापर करून पशुखाद्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण*
जिलह्यात उपलब्ध असलेल्या निकृष्ट तसेच कोरड्या चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी त्यावर युरिया ट्रीटमेंट तसेच संप्रेरकांचा वापर यांसारख्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिकांचे आयोजन करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण द्यावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पशुधनाला भविष्यात चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी चारा उत्पादन वाढविणे, पर्यायी चारा स्रोतांचा शोध घेणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि उपलब्ध चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविणे या सर्व बाबींचा समन्वय साधून संबंधित विभागांनी एकत्रितपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे