प्रशासकिय

पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा चारा व पाणी नियोजनासाठी दिशादर्शक मार्गदर्शन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, दि. ०१ नोव्हेंबर
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संरक्षण, चारा व पाणी उपलब्धता, दुग्धव्यवसायाची सद्यस्थिती आणि आगामी काळातील उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. किरण पाटील यांनी दिनांक २९ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्याचा व्यापक पाहणी दौरा केला. या दौऱ्यात विविध तालुक्यांतील दूध संघ, गोशाळा, पशुखाद्य उद्योग, शेतकरी व पशुपालकांशी संवाद साधत चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध संसाधने, स्थानिक उपाययोजना आणि भविष्यातील नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
संगमनेर तालुक्यातील राजहंस दूध संघ व जीवदया गोशाळेस सदिच्छा भेट देऊन तेथील व्यवस्थापन, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि गोशाळेतील उपक्रमांची माहिती घेतली. राजहंस दूध संघाच्या कार्यक्षेत्रात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाची व्यापक जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
३० ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघास भेट देऊन दूध संकलन, दुग्धव्यवसायाची सद्यस्थिती, पशुपालकांना उपलब्ध सुविधा व दुष्काळाचा व्यवसायावर होणारा परिणाम जाणून घेतला. त्यानंतर वळूमाता प्रक्षेत्राला भेट देऊन पशुधनाची स्थिती, चारा-पाणी व्यवस्थापन व आरोग्यविषयक सुविधांची पाहणी केली.
यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर उपलब्ध सुक्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. युरिया, गूळ व मीठ यांच्या योग्य वापरातून निकृष्ट चारा अधिक सकस करण्याची पद्धत पशुपालकांना समजावून सांगण्यात आली. याच तालुक्यात मुरघास पुरवठा क्षेत्रात कार्यरत Agrineurics कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. सुमारे १ लाख मेट्रिक टन मुरघास पुरवठा क्षमता असलेल्या या कंपनीच्या प्रतिनिधींकडून उपलब्धता व पुरवठा व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात आली. स्थानिक पातळीवर मुरघास उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
पुढील टप्प्यात शेवगाव तालुक्यातील श्रीकृष्ण गोशाळेला भेट देण्यात आली. चारा साक्षरता व संवर्धन अभियानांतर्गत उपलब्ध सुक्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया, गूळ व मीठ यांच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर करून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे पशुपालक व शेतकऱ्यांशी संवाद साधून परिसरातील तीव्र चारा व पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतली. निकृष्ट चारा सकस करण्यासाठी राबविलेल्या प्रात्यक्षिकांची माहिती घेतली. चारा व उसाचे दर तुलनेने कमी असतानाच मुरघास निर्मितीचे नियोजन करण्याचे आवाहन केले. तसेच पशुपालकांनी आपले मूल्यवान पशुधन विक्री करू नये, असे आवाहन केले. परिसरात मुरघास विक्रेत्यांच्या माध्यमातून स्थानिक चारा डेपो सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही निर्देश दिले.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा जामखेड तालुक्यात घेण्यात आला. फक्राबाद येथील श्री. गांगेय गोशाळेला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाची माहिती घेतली. उपस्थित पशुपालक व महिलांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधून चारा व पाणीटंचाईच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.
दिवसभरातील विविध तालुक्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यालय येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील पशुधनाची सद्यस्थिती, चारा व पाणी उपलब्धता आणि आगामी काळातील चारा नियोजन व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. रामनाथ वदक व सामाजिक कार्यकर्ते श्री. सागर वाकचौरे यांच्याशी चारा नियोजनासंदर्भात चर्चा करून त्यांचे अभिप्राय व सूचना जाणून घेतल्या. तसेच उपस्थित इतर पशुपालकांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांच्या आधारे चारा टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
३१ ऑक्टोबर रोजी कामरगाव येथे भेट देऊन स्थानिक परिस्थितीची माहिती घेण्यात आली. त्यानंतर पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी येथील जाफा पशुखाद्य कंपनीला भेट देऊन पशुखाद्य निर्मितीची तांत्रिक प्रक्रिया व प्रयोगशाळेतील गुणवत्ता तपासणीची पाहणी केली. पुढे रांजणगाव मशीद येथील ज्ञानेश्वरी गोपालन संस्थेला भेट देऊन तेथील परिपोषण आहार योजना, जीवामृत, गोबर गॅस व मुरघास निर्मिती यांसारख्या उपक्रमांची माहिती घेतली. रांजणगाव मशीद व पिंपरी गवळी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून चारा व पाणीटंचाईच्या समस्या जाणून घेतल्या. तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून चारा बियाणे वाटपाचा आढावा घेऊन आगामी काळात इतर विभागांशी समन्वय साधून चारा व पाणी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
या दौऱ्यात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. दशरथ दिघे तसेच संबंधित तालुक्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या दौऱ्यातून उपलब्ध निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविणे, मुरघास निर्मिती व मोठ्या प्रमाणावरील पुरवठा व्यवस्था, चारा बियाणे वाटप, स्थानिक चारा डेपो, पाणी उपलब्धतेचे नियोजन, गोशाळांमधील पूरक उपक्रम आणि पशुधन आरोग्य सेवा या सर्व बाबींचे एकत्रित नियोजन करण्यावर भर देण्यात आला. टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचा वेळीच वापर करून चारा व पाण्याची पूर्वतयारी करणे, स्थानिक पातळीवर चारा उपलब्धतेची साखळी निर्माण करणे आणि पशुपालकांच्या सहभागातून पशुधनाचे संरक्षण करणे, हा या दौऱ्याचा प्रमुख दिशादर्शक संदेश ठरला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे