राष्ट्रीय लोकन्यायालयाचे जिल्ह्यात आयोजन लोकन्यायालयात सहभागी होण्याचे विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन

अहमदनगर दि. १९ जुलै :- आपापसातील वाद तडजोडीने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे शनिवार दि.२७ जुलै, २०२४ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिली.
या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेतील तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे (उदा. चोरीची प्रकरणे, किरकोळ मारहाणीची प्रकरणे), चेक बाऊन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे तसेच बँक व वीज वितरण कंपनीचे दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचाचे प्रकरणे लोकन्यायालयामध्ये तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत.
ज्या नागरिकांना आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील, त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा अहमदनगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास संपर्क क्रमांक ८५९१ ९०३६१६ तसेच dlsanagar@gmail.com यावर ईमेल संपर्क करू शकता. लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणांमध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
*कोर्ट फी परत मिळणार*
लोकन्यायालयामध्ये प्रकरण मिटवल्यास कोर्ट फी परत मिळते. लोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीने मिटविल्याने वेळेचा आणि पैशांचा अपव्यय टाळला जातो. लोकन्यायालयात प्रकरण तडजोडीने मिटविल्यास त्यावर वरिष्ठ न्यायालयात पुन्हा अपिल करता येत नाही. त्यामुळे दोन पक्षकारांमधील वादाला पूर्ण विराम मिळतो.