ओझर बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीपासून दिड की.मी. पर्यंत वाळुउपशास बंदी घाला – यादव

राहुरी / प्रतिनिधी — सन १८७३ साली इंग्रजांनी ओझर येथे प्रवरा नदीवर बांधलेल्या प्रवरा उजवा व डावा कालवा यांना जोडणाऱ्या संरक्षक भिंतीपासून दिड कि.मी. पश्चिमेकडील बाजूस वाळू उत्खनन करण्यात येवू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मच्छिंद्र रामा यादव यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रवरा नदिवर ओझर येथून दोन्ही कालवे सुरू होतात या बंधाऱ्यावर प्रवरा उजवा व डावा कालवा यांना जोडणारी संरक्षक भिंत मागील काही वर्षापूर्वी वाळू उत्खननामुळे फुटली होती.व मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याने त्याचा परिणाम शेतीसिंचनावर झाला होता हे पाणी वाहून गेल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या फुटलेल्या भिंतीसाठी प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले होते. या सर्व प्रकाराची पुनरावृत्ती होवू नये म्हणून आपण जिल्ह्याचे दंडाधिकारी असल्याने व महसूल विभाग आपल्या अखत्यारीत येत असल्याकारणाने आपण वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील वाळूउपशावर निर्बंध आणण्यासाठी कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे आपणाकडून कुठलीही कार्यवाही न झाल्यास पुढील ९० दिवसानंतर उपोषणाचा इशारा देण्यात येत असल्याचे पत्रकार मच्छिंद्र रामा यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार संगमनेर, पोलिस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी संगमनेर, पोलीस निरीक्षक संगमनेर यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे