सामाजिक

घरकुलाच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचा वाजंत्री मोर्चा गोरगरिबांना महापालिकेच्या घरकुल योजनेत तातडीने समाविष्ट करण्याची मागणी

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 25 नोव्हेंबर: (प्रतिनिधी)– अहिल्यानगर शहरातील वर्षानुवर्षे घरकुलापासून वंचित असलेल्या गोरगरिबांच्या निवाऱ्याच्या प्रश्नाला न्याय मिळावा, यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोमवारी भव्य वाजंत्री मोर्चाचे आयोजन करण्यात आले. महापालिका प्रशासनाला जाग आणण्याच्या उद्देशाने काढलेल्या या मोर्चात बेघर कुटुंबीयांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, संजय ताकवाले, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, उपाध्यक्ष विवेक विधाते, विकास रणदिवे, महिला आघाडी शहराध्यक्षा सुनीता शिंदे, उपाध्यक्षा नेहा जावळे, संघटक बेबीताई टकले, सचिव मंगल बरकाडे, रूपाली आयची, सविता कवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, गोरगरिबांसाठी घर मिळवणे तर दूर, रहिवासी जागा मिळवणेही अशक्य झाले आहे. वारुळाचा मारुती आणि काटवण खंडोबा परिसरात महापालिकेचे मोठ्या प्रमाणात भूखंड पडून असून, त्या जागांवर घरकुल प्रकल्प उभारून बेघरांना निवारा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
महापालिकेने 2012 ते 2014 दरम्यान याच परिसरात घरकुल योजना राबवून काही नागरिकांना घरे उपलब्ध करून दिली होती. तोच प्रकल्प पुन्हा सुरू करून हातावरील पोट असलेल्या कुटुंबांना दिलासा द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
18 नोव्हेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बेघर नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गरजूंना कमी किमतीत घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी भूमिका मांडली. अनेक नागरिकांनी आपल्या हालअपेष्टा सांगत तातडीने घरकुलाची मागणी व्यक्त केली.
मोर्चात बोल्हेगावमधील गांधीनगर समोरील चोभे कॉलनी– डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या तुटवड्याचाही मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला.
रस्ते, सांडपाणी, ड्रेनेज यांसारख्या नागरी सुविधांचा 20-30 वर्षांपासून अभाव असल्याची तक्रार करण्यात आली. रो-हाऊसिंग परिसरातील उघड्या सेप्टिक टँकमुळे निर्माण झालेली दुर्गंधी, प्राणी मृत्यू आणि मुलांच्या सुरक्षिततेचा धोका याबाबतही नागरिकांनी संताप व्यक्त केला. समाजमंदिर परिसरातील अर्धवट भराव काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
रिपब्लिकन सेनेने वारुळाचा मारुती–काटवण खंडोबा परिसरातील भूखंडांवर घरकुल प्रकल्प राबवावा आणि गांधीनगर–चोभे कॉलनीतील नागरी समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी ठाम मागणी केली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास महापालिकेमध्ये गाढव सोडून तृतीयपंथीयांच्या सहभागासह पुढील तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे