देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, दि. 15 जानेवारी: “आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक पार पडत आहे. ज्या शहरामध्ये आपण राहतो आणि जे शहर आपल्याला घडवते, त्या शहराप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी लोकशाहीच्या कर्तव्याचे भान ठेवून, मतदानातून आपण शहराच्या विकासात हातभार लावायचा आहे. मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतदान केंद्रांवर योग्य सोयी-सुविधा पुरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नव्या वर्षात आपण सर्वजण मतदानाच्या माध्यमातून शहराला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करूया. मतदान केंद्रांवर आम्ही तुमची वाट पाहत आहोत,” असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी सर्व विभाग, कक्ष तसेच अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, मदतनीस आणि सावलीची व्यवस्था मुबलक प्रमाणात करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदानासाठी ग्राह्य धरलेली ओळखपत्रे खालीलप्रमाणे आहेत (मतदारांनी यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे):
१) भारताचे पारपत्र (पासपोर्ट)
२) आधार ओळखपत्र
३) वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
४) आयकर विभागाचे पॅन ओळखपत्र (पॅन कार्ड)
५) केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्रासह (फोटो) दिलेली ओळखपत्रे
६) राष्ट्रीयकृत बँका अथवा टपाल खात्यामधील खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक
७) सक्षम प्राधिकाऱ्याने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला
८) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)
९) निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.)
१०) लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
११) स्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र
१२) केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड (स्मार्ट कार्ड)
मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंडे, स्वीप नोडल अधिकारी तथा साहाय्यक आयुक्त अशोक साबळे, साहाय्यक आयुक्त सपना वसावा, मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन आणि प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा