माणूस म्हणून जगण्याची आद्य संकल्पना देणारे छत्रपती शिवाजी महाराजच होय.-मेधा देशमुख- भास्करन
अहमदनगरची अक्षर परंपरा ऑनलाइन व्याख्यानमाला संपन्न

अहमदनगर दि.६ जून (प्रतिनिधी)
” शेतसारा, चेन ऑफ कमांड, गुलामांची खरेदी-विक्री पद्धत बंदी, आदी शेकडो संकल्पनांचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती करून माणसाला जगण्याची आद्य संकल्पना प्रदान केली. गुलामगिरीच्या दुय्यम स्थानापेक्षा स्वाभिमानाने जगण्याचे प्रथम स्थान महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजन्म संघर्ष केला. या संघर्षाला यशाची,पराक्रमाची , हौतात्म्याची व शौर्याची किनार आहे,” असे प्रतिपादन ” चॅलेंजिंग डेस्टिनी ” या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित इंग्रजी पुस्तकाच्या आंतरराष्ट्रीय लेखिका मेधा देशमुख- भास्करन यांनी केले.
भारताच्या आजादी का अमृत महोत्सव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्य दिनानिमित्त तसेच अहमदनगर शहराच्या 532 व्या वर्धापन दिनानिमित्त तंत्रशिक्षण व उच्च शिक्षण विभाग ,महाराष्ट्र राज्य,ग्रंथालय संचालनालय मुंबई तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या माध्यमातून आयोजित अहमदनगरची अक्षर परंपरा व भारतीय इतिहासाचे मोती या उपक्रमात” झुंज नियतीशी ” या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठी पुस्तकावर ‘ मेधा भास्करन देशमुख बोलत होत्या.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले व ग्रंथालयाच्या विविध नाविन्यपूर्ण संकल्पना स्पष्ट केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अमोल बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामदास शिंदे , हनुमान ढाकणे, संतोष कापसे, शैलेश घेगडमल, अमोल इथापे यांनी परिश्रम घेतले.