देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि. 8 मे (प्रतिनिधी)- अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बीड ते मंत्रालय, मुंबई दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या लॉंग मार्चच्या यशस्वी नियोजनासाठी तारकपूर बसस्थानक परिसरातील व्ही स्टार येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस लॉंग मार्चचे प्रमुख संयोजक सिद्धार्थ शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवृत्ती आरू होते.
यावेळी नगरसेवक सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, परिमल निकम, विजयराव भांबल, संजय खामकर, एन. एम. पवळे, शिवाजी साळवे, अमित काळे, विलास साठे, राजू उबाळे , प्रा. जयंत गायकवाड, महेश भोसले, कौशल गायकवाड, विशाल कांबळे, विशाल भिंगारदिवे, विशाल गायकवाड, प्रा डि आर जाधव, सागर ठोकळ, सचिन शेलार, शरद मेढे, प्रा एल बी जाधव, सिद्धार्थ आढाव, समीर भिंगारदिवे, सृजन भिंगारदिवे, दिपक अमृत, शिवाजी भोसले, छानराज क्षेत्रे, मयूर पाखरे, अजय पाखरे, दया गजभिये, पंकज लोखंडे, जयश्री गायकवाड, हनुमंत गायकवाड, वैभव जाधव, संकेत गव्हाले, श्रेयस भिंगारदिवे, सनी भाकरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक विलास साठे यांनी केले.
बैठकीत माहिती देताना सांगण्यात आले की, 10 जून रोजी बीड येथून लॉंग मार्चला प्रारंभ होणार असून 15 जून रोजी हा मार्च अहिल्यानगर शहरात दाखल होईल. त्यानंतर विविध जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत 26 जून रोजी मंत्रालय, मुंबई येथे धडक देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना नगरसेवक सुरेश बनसोडे म्हणाले की, समाजहिताला आम्ही नेहमीच प्रथम प्राधान्य देणार आहोत. समाजाच्या प्रश्नांवर संघर्ष करताना कोणताही दबाव आला तरी पदाचा त्याग करण्यासही आम्ही मागेपुढे पाहणार नाही. लॉंग मार्चमध्ये सहभागी होणाऱ्या भीमसैनिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था उत्कृष्टपणे करण्यात येतील. तसेच अहिल्यानगर शहरातून मोठ्या संख्येने भीमसैनिक या मार्चमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले की, सुरेश बनसोडे यांनी घेतलेले प्रत्येक सामाजिक उपक्रम यशस्वी झाले आहेत. त्यामुळे या लॉंग मार्चचे नियोजनही त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल. चर्मकार समाज गावोगावी जाऊन जनजागृती करत असून चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. अहिल्यानगर, पुणे आणि मुंबई परिसरातील चर्मकार समाज उपवर्गीकरणाच्या विरोधात एकजुटीने उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लॉंग मार्चचे प्रमुख संयोजक सिद्धार्थ शिनगारे यांनी राज्य सरकारच्या आरक्षण धोरणावर टीका करताना सांगितले की, अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाचा मुद्दा पुढे करून विविध समाजघटकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समाजातील मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जाती-धर्मांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे कारस्थान राबविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, अनुसूचित जातींमधील बहुतांश जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयानंतर राज्य शासनाने अनंत बदर आयोगाच्या अहवालाच्या आधारे उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 नुसार अनुसूचित जातींशी संबंधित अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला असल्याने हा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा त्यांनी केला.
या लॉंग मार्चद्वारे शासनाकडे काही प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबविणे, अनंत बंदर आयोगाचा अहवाल सार्वजनिक करणे, जातनिहाय जनगणना करणे, अनुसूचित जातींसाठी रिक्त असलेल्या सुमारे 40 टक्के अनुशेष जागा तातडीने भरणे आणि पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवणे या मागण्यांचा समावेश आहे.
या लॉंग मार्चमध्ये राज्यभरातून हजारो नागरिक आणि भीमसैनिक सहभागी होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा