निबंध स्पर्धेतून पोलिसांविषयी सकारात्मकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न : पोलिस अधीक्षक पाटील
स्नेहंबधतर्फे निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलिस रेझिंग डे निमित्त निबंध स्पर्धा आयोजित करून समाजात पोलिसांप्रती आदरभाव निर्माण केला. पोलिसांविषयी सकारात्मक विचारभाव प्रस्थापित करण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याबद्दल स्नेहबंध फाउंडेशनचे आभार, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.
पोलिस रेझिंग डे निमित्त स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या शालेय व खुल्या गटासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेचे पारितोषिक वितरण पोलिस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपाधीक्षक (गृह) मेघश्याम डांगे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ, स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, शिल्पकार बालाजी वल्लाल, सचिन पेंडूरकर, बाबासाहेब शिंदे, संकेत शेलार आदी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले,
लहानपणापासून मुलांना पोलिसांबद्दल भीती दाखवली जाते. परंतु चांगल्या बाजू सांगितल्या जात नाहीत. कोरोनाच्या काळातील पोलिसांचे कार्य अभिनंदनीय आहे. कोरोनामुळे जनमाणसात पोलिसांप्रती आदरभाावना वृद्धींगत झाल्या आहेत. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रजासत्ताक दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. परंतु पुढील प्रजासत्ताक दिन आपण उत्साहात साजरा करू, अशी आशा बाळगुया.
निबंध स्पर्धेत शालेय गटातून सृष्टी प्रवीण हिकरे ही प्रथम, कीर्ती मांगीलाल व्यास द्वितीय, तर तृतीय क्रमांक सायली राहुल कांबळे हिने पटकावला. खुल्या गटातून प्रथम क्रमांक साईगीता गणेश सब्बन, द्वितीय विनोद बन्सीलाल भंडारी, तृतीय काजल सागर बोरा, उत्तेजनार्थ अक्षय सुनील वैद्य यांनी पोरितोषिक देण्यात आले. प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलिसांची गरज
लोकांना जशी उपचारासाठी डॉक्टरची गरज असते, इमारतींच्या बांधकामासाठी इंजिनिअरची गरज असते, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलिसांची गरज असते. आपल्या समाजात विविध प्रकारचे लोक एकत्र राहतात आणि एकत्र राहण्याने त्यांच्यासाठी परस्पर संघर्ष देखील वाढू शकतो. त्यामुळे समाजात शांतता राखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिस रात्रंदिवस काम करतात, असे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यावेळी म्हणाले.