पोलीस अधीक्षक ओला यांच्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल : शिंदे स्नेहबंध फाउंडेशन तर्फे नूतन पोलीस अधीक्षकांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) – नूतन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर आणि नागपूर येथे अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतपणे काम करण्याची त्यांच्या शैलीमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी व्यक्त केला.
नूतन पोलिस अधीक्षक म्हणून राकेश ओला यांचा स्नेहबंध फाउंडेशन तर्फे रोप देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी शिंदे बोलत होते.
शिंदे म्हणाले, २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले ओला यांची कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये श्रीरामपूरला येथे असताना त्यांनी तोतया पोलिस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीचा त्यांनी छडा लावला होता. जिल्ह्याच्या उत्तरेस वाळू तस्करांवरही त्यांनी कारवाया केल्या होत्या. नागपुरात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तोतया पोलिस बनून लुटणाऱ्या टोळीचा, तसेच कारची काच फोडून रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा त्यांनी छडा लावला. कोणत्याही परिस्थितीत शांतपणे काम करणे ही त्यांची शैली आहे. त्यांच्या याच शैलीमुळे नगर जिल्हा गुन्हेगारीमुक्त असा विश्वास उद्धव शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा, यासाठी विशेष लक्ष देणार आहे. नागरिकांना कुठलीही तक्रार असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे अधीक्षक ओला यांनी यावेळी सांगितले.