अहमदनगर मध्ये एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद! जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून केला दौडचा शुभारंभ

अहमदनगर, दि. 31 ऑक्टोबर( प्रतिनिधी) – सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन दि. 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमीत्ताने जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आज सकाळी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. वाडिया पार्क येथून प्रारंभ झालेल्या या दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
वाडिया पार्क, जुने महानगरपालिका ऑफिस, जुने कोर्ट, दिल्ली गेट मार्गे जाऊन पोलीस परेड ग्राउंड येथे या दौडचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार वैशाली आव्हाड, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या दौडमध्ये कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.