देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :मुंबई, दिनांक 1 मे (वार्ताहर/प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य 66 व्या स्थापना दिनानिमित्त
विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.प्रा.राम शिंदे यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे व महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा.श्री.अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 07.10 वाजता ध्वजवंदन सोहळा साजरा झाला.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पारंपरिक मराठमोळया पध्दतीने स्वागत करण्यात आले. विधान भवनाचा आसमंत सनई-चौघडा व तुतारीच्या निनादाने मांगल्य आणि उत्साहाने बहरून गेला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.प्रा.राम शिंदे यांनी अभिवादन केले. महाराष्ट्र हे देशपातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे असे आवाहन करून त्यांनी राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी केलेल्या संदेशपर भाषणात त्यांनी पहेलगाम येथे पर्यटकांवर धार्मिक कट्टर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मरण पावलेल्या पर्यटकांना श्रध्दाजंली अर्पण केली. अशा संकटसमयी त्यांच्या कुटुंबियांसमवेत आपण सर्व भारतीय ठामपणे उभे आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
ध्वजवंदन सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (1) श्री.जितेंद्र भोळे, सचिव (3) डॉ.विलास आठवले, सचिव (4) श्री.शिवदर्शन साठ्ये, सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी श्री.राजेश तारवी, सह सचिव श्री.नागनाथ थिटे, उप सचिव श्री.सुभाष नलावडे, श्री.रविंद्र जगदाळे, श्रीमती पूनम ढगे, श्री.उमेश शिंदे, श्री.विजय कोमटवार, श्री.मोहन काकड यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी श्री.राजू भुजबळ आणि राखीव पोलीस उप निरीक्षक श्रीमती अरुणा जॉन्सन बुरकेन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा