प्रशासकिय

महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण समाजातील प्रत्येक घटकाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध -पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि.१ मे – शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आपला जिल्हा अग्रेसर आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून समाजातील प्रत्येक घटकाचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशून संदेश देताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित प्रकल्पाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्य पार्श्वभूमीवर शिर्डी व शनिशिंगणापूर येथे विकासकामे करण्यात येत‌ आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली असून महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. त्यादिशेने राज्यशासन काम करत आहे. गोदावरी खोऱ्यात पश्चिम वाहिन्यांचे पाणी आणण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असून विदर्भातील सर्वात मोठे नळगंगा-वैणगंगा प्रकल्प राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
सौरउर्जेमध्ये आपल्या राज्याने केलेली प्रगती ही लक्षणीय असून सौरउर्जेच्या वापरामध्ये आपले राज्य संपूर्ण देशामध्ये अग्रेसर आहे. आपले राज्य सर्वच आघाड्यांवर स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रालाही पोषक वातावरण निर्माण होत असून उद्योगांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यातही होत आहेत. शिर्डी येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये संरक्षण सामग्री उत्पादन करणाऱ्या कारखान्याच्या उभारणीस सुरुवात झाली असून अहिल्यानगर येथेही ६०० एकर जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी देण्यात आली आहे. उद्योग, व्यापार वाढीस लागून रोजगाराला अधिक प्रमाणात चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
नुकत्याच जाहीर झालेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार प्राप्त झाले असून शिवछत्रपती पुरस्काराने चार खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे. या सर्व अधिकारी व खेळाडूमुंळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडल्याचे सांगत पुरस्कारप्राप्त अधिकारी व खेळाडूंचे पालकमंत्र्यांनी यावेळी अभिनंदनही केले.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींप्रती सहवेदना व्यक्त करत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभा असल्याचेही त्यांनी सांगितले.

⭕यांचा झाला सन्मान…जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यवतमाळ येथे अभिप्राय कक्ष सुरु केल्याबद्दल मुंबई येथे ‘राज्यस्तरीय सेवा हक्क पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्याानिमित्त्त पाालकमंत्री यांनी श्री. आशिया यांचा सन्मान केला.

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये उत्कृष्‍ट कार्य केल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.
पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार खलील दाऊद शेख, मल्लिकार्जून कैलास बनकर दिगंबर रावसाहेब कारखेले, गणेश रामदास चव्हाण, कृष्णा नाना कुऱ्हे, पोलीस शिपाई प्रमोद मोहनराव इंगळे यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरणही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे