देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क (: जामखेड प्रतिनिधी रोहित राजगुरू)
जामखेड नगरपरिषद निवडणूकीसाठी प्रशासन पातळीवर हालचालीस सुरुवात झाली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या तीनने तर प्रभाग संख्या १२ आहे. २०१५ च्या पहिल्या निवडणुकीसाठी २१ प्रभाग व २१ नगरसेवकांची संख्या होती. यावर्षी एका प्रभागात दोन नगरसेवक प्रमाणे १२ प्रभाग तयार करण्यात येत असून या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा ४ जुलै रोजी तयार करण्यात येणार आहे.
त्या दृष्टीने नगरपरिषदेत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जामखेड शहर सात वाड्यावस्त्यांचा समावेश नगरपरिषदेत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार नगरपरिषद लोकसंख्या ३९५५१ आहे. चाळीस हजाराच्या पुढे लोकसंख्या होण्यासाठी ४५० लोकसंख्या कमी पडली नाहीतर जामखेड नगरपरिषदेला “ब “दर्जा मिळाला असता.
जामखेड नगरपरिषदेची स्थापना २०१४ साली झाली होती. दिड दोन वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सन २०१५ प्रभागरचना करण्यात आली होती. त्यावेळी एका प्रभागात एक नगरसेवक यापध्दतीने २१ प्रभाग निर्माण करण्यात येऊन नगरसेवक संख्या २१ ठेवण्यात आली होती व २०१६ ला जामखेड नगरपरिषदेची पहिली निवडणूक झाली होती व निवडणूक आलेल्या नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडण्यात आला होता.
जामखेड नगरपरिषदेसाठी २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरली होती. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना चार वर्षे होऊनही झाली नाही. १४ वर्षातील लोकसंख्या पाहता आता हा आकडा ५० हजार पेक्षा जास्त झाला आहे. शासनाने २०११ ची जनगणनेच्या आधारे लोकसंख्या ३९५५१ धरली आहे. या निवडणुकीत ‘क’ वर्ग नगरपरिषदांसाठी २५ जानेवारी २०२२ च्या राजपत्रानुसार ज्या शहराची लोकसंख्या २५ हजारापर्यंत आहे, अशा शहरासाठी किमान २०नगरसेवक राहतील आणि २५ हजार लोकसंख्येच्या पुढील ३ हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक असेल.
जामखेड नगरपरिषद हद्दीतील लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३९५५१ आहे. यामध्ये कोणतेही वाढ न सुचवता तेवढीच प्रमाण मानण्यात आली आहे. एका प्रभागात दोनच सदस्य ठेवण्यात आले आहेत असा निकष लागू आहे.
२०१६ ला २१ प्रभाग व एक नगरसेवक असे प्रमाण होते. आता एका प्रभागात दोन नगरसेवक प्रमाणे १२ प्रभाग व २४ नगरसेवक करण्यात आले आहे व जनतेतून नगराध्यक्ष पद निवडण्यात येणार असल्याने एक नगराध्यक्ष व २४ नगरसेवक
अशी एकूण २५ लोकप्रतिनिधी निवडण्यात येणार आहे. पाच वर्षांची नगरसेवक पदाची मुदत २०२१ ला संपली आहे तेव्हा पासून आत्तापर्यंत प्रशासक राजवट लागू आहे.
यापूर्वी असणाऱ्या २१ नगरसेवकापैकी ठरावीकच माजी नगरसेवकांनी सातत्य दाखवून पक्षाच्या माध्यमातून जनसंपर्क ठेवला आहे. अनेक नगरसेवकांना जनता विसरून गेली आहे.
मागील चार वर्षांत अनेक नवीन इच्छुक पुढे आले परंतु निवडणूक सारखी लांबत राहील्याने त्यांनी काढता पाय घेतला. या माजी नगरसेवकापैकी व नवीन इच्छुकांना जामखेड शहर व वाड्या वस्त्यातून विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आपल्या नेत्याला मताधिक्य देता आले नाही त्यामुळे या माजी नगरसेवक व नवीन इच्छुकापुढे आव्हान उभे राहणार आहे.
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
जामखेड नगरपरिषदेचा ‘क’ वर्ग नगरपरिषदेत समावेश आहे. त्यामुळे ‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी निवडणूक आयोगाने घातलेल्या निकषानुसार ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची पूर्व तयारी सुरू झाली आहे. पूर्वी २१ प्रभाग व २१ नगरसेवक होते. आता एका प्रभागात दोन नगरसेवक व २४ नगरसेवक व एक नगराध्यक्ष असे चार लोकप्रतिनिधी वाढले आहे.
अजय साळवे – मुख्याधिकारी नगरपरिषद जामखेड
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा