जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे मोठे योगदान : उद्धव शिंदे ‘स्नेहबंध’तर्फे अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या पोलिसांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सुद्धा क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
नाशिक येथे झालेल्या वेस्टझोन अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल अर्चना काळे, हेड कॉन्स्टेबल अन्वर अली सय्यद, हेडकॉन्स्टेबल अशोक अबनावे यांचा सन्मानपत्र व पदक देऊन पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर गौरव करण्यात आला. त्यावेळी शिंदे बोलत होते. याप्रसंगी राखीव पोलिस दलाचे पोलिस निरीक्षक अनुजकुमार मडामे, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, पोलिसांच्या दैनंदिन जीवनाकडे पाहिले तर त्यांच्या संयम का सुटतो याचे काहीसे उत्तर मिळू शकतो. पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी बसलेल्या पोलिसाला कशाप्रकारच्या शाब्दिक भडिमाराला जावे लागते, याची कल्पना तासभर पोलिस स्टेशनमध्ये बसल्यावर सहज येईल. त्यांच्या दैनंदिन कामातून वेळ काढून पोलिसांनी नाशिक येथे झालेल्या उत्कृष्ट कामगिरी करून यश मिळवले व जिल्ह्याचे नाव रोशन केले. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून हा छोटेखानी कार्यक्रम घेतला. नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत हेडकॉन्स्टेबल सय्यद यांनी ५० वयोगटात धावणे, लांबउडी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत चार सुवर्णपदके पटकावली. महिला हेडकॉन्स्टेबल काळे यांनी ४० वयोगटात धावणे व मिक्स रिले स्पर्धेत प्रथम क्रमांकासह ५ सुवर्णपदक आपल्या नावे केली. तर हेडकॉन्स्टेबल अबनावे यांनी ५५ वयोगटात लांबउडीत रौप्य, तर धावणे व मिक्स रिलेमध्ये कांस्य पदक पटकावले. आम्ही नाशिक येथे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल नगरमध्ये घेतल्याने आमची मान अभिमानाने उंचावली, अशी प्रतिक्रिया या तिघा पोलिसांनी दिली.