देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : विशेष प्रतिनिधी मुंबई/हैदराबाद: अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड (Alembic Pharmaceuticals Limited) मधील कामाचा असह्य ताण आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून कॉम्रेड जे. अखिलेश (२३) या तरुण कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर देशातील औषध आणि विक्री प्रतिनिधींची सर्वात मोठी संघटना ‘एफएमआरएआय’ (FMRAI) कमालीची आक्रमक झाली असून, त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना (MD) पत्र लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अनैतिक कामांसाठी टाकला जात होता दबाव.
फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशन ऑफ इंडियाने (FMRAI) ७ मार्च रोजी अलेम्बिक फार्माचे एमडी शौनक अमीन यांना पाठवलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत. पत्रात नमूद केल्यानुसार, हैदराबाद येथील कंपनीच्या ‘इलेना’ डिव्हिजनमध्ये कार्यरत असलेल्या अखिलेश याच्यावर त्याच्या लाईन मॅनेजर्सकडून अनैतिक व्यापार पद्धतींचा अवलंब करण्यासाठी आणि वैद्यकीय शिबिरांमध्ये ‘फ्लेबोटोमिस्ट’ (रक्त तपासणीसाठी रक्त काढणारे कर्मचारी) म्हणून काम करण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात होता. अखिलेशने या बेकायदेशीर आणि अनैतिक कामांना नकार दिल्यामुळे त्याचा मानसिक छळ करण्यात आला.
विषारी कार्यसंस्कृतीचा बळी!
“हा अमानुष दबाव आणि छळ सहन न झाल्यानेच या तरुण कामगाराला टोकाचे पाऊल उचलावे लागले. ही आत्महत्या नसून कंपनीतील विषारी (Toxic) आणि जुलमी कार्यसंस्कृतीचा हा थेट परिणाम आहे,” असा आरोप संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या त्रासाबद्दल संघटनेने १६ ऑक्टोबर २०२५ रोजीच पत्राद्वारे कंपनीचे लक्ष वेधले होते, मात्र व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावाही युनियनने केला आहे.
युनियनच्या प्रमुख मागण्या:
या घटनेच्या निषेधार्थ एफएमआरएआयने व्यवस्थापनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:
१. अखिलेशचा छळ करणाऱ्या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना (ZBM श्री. रुद्रय्या, RBM श्री. राजेश आणि ABM श्री. निखिल) तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
२. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला योग्य आर्थिक भरपाई देण्यात यावी.
या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील ‘टॉक्सिक वर्क कल्चर’ आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी आता अलेम्बिक फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अलेम्बिक फार्मास्युटिकल्सच्या असंवेदनशीलतेच्या निषेधार्थ व दिवंगत कॉम्रेड जे. अखिलेश यांना आदरांजली देण्यासाठी अहिल्यानगर शहरातील माणिक चौक या ठिकाणी फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशन ऑफ इंडिया (FMRAI) अ.नगर युनिट घ्या वतीने कॅण्डल मार्च काढण्यात आला.
यावेळी संघटनेचे राज्य कमिटी मेंबर कॉम्रेड दीपक पापडेजा, जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सिद्धेश्वर कांबळे, युनिट सेक्रेटरी कॉम्रेड किरण वाळके, कॉम्रेड प्रकाश मुनोत, दीपक शिंदे,अरविंद पंतम,महेश चांगली, प्रदीप झोडगे, विजय डोळसे, ज्ञानेश्वर मेहेत्रे,संभाजी खुळे,वाल्मीक गायकवाड,मझहर शेख, आशिष कुर्री ,शुभम गाडेकर, लक्ष्मण मिसाळ, वीरेंद्र विश्वकर्मा, अविनाश ठुबे, राजेंद्र खेडकर आदींसह सेंट्रल इंडियन ट्रेड युनियनस् (सीटू) चे जिल्हा समन्वयक कॉम्रेड प्रविण सोनवणे उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा