श्रद्धांजली

आंबेडकरी चळवळीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी शोकसभा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा अहिल्यानगर शहराच्या विकासात मोलाचे योगदान; बहुजन समाजाचा पाठीराखा हरपल्याची भावना.

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर: दि. 11 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- शहरातील आंबेडकरी चळवळीच्या वतीने महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण स्व. पवार यांच्या हस्ते झाले होते. याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत स्व. अजित पवार यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
हा श्रद्धांजली कार्यक्रम आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास नगरसेवक सुरेश बनसोडे, अमित काळे, विजय भांबळ, विलास साठे, सुमेध गायकवाड, सिद्धार्थ आढाव, विशाल कांबळे, युवराज पाखरे, मंगेश मोकळ, पांडुरंग भिंगारदिवे, राहुल आल्हाट, शनेश्‍वर पवार, निखिल सुर्यवंशी, कृष्णा भिंगारदिवे, रवी सुर्यवंशी, गौतम कांबळे, रोहित कांबळे, अजय पाखरे, विक्की पाटोळे, संतोष कांबळे, हृषिकेश पाडळे, राहुल सोनवणे, राहुल विघावे, विक्रम चव्हाण, गोविंद जगदाळे, पप्पू पाटील, दीपक गायकवाड, सागर विधाते, समीर भिंगारदिवे, सृजन भिंगारदिवे, सुजित घंगाळे, अनिल शिंदे आदींसह आंबेडकरी समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक गायकवाड म्हणाले की, उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अचानक अपघाती निधनाने संपूर्ण राज्यावर मोठा आघात झाला आहे. घात की अपघात? या प्रश्‍नावर पूर्णविराम देण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अहिल्यानगर शहरासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि शहराचा कायापालट केला. राज्यात त्यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पुरस्कार केला. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा एक मजबूत पाठीराखा हरपला असून बहुजन समाजातील दुर्मिळ नेता गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नगरसेवक सुरेश बनसोडे म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराला सर्वाधिक निधी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी उपलब्ध करून दिला. शहरावर त्यांचे विशेष प्रेम होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीही त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पुतळा उद्घाटनाच्या वेळी त्यांनी आंबेडकर स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. आंबेडकरी समाजावर प्रेम करणारा नेता आपण गमावल्याचे त्यांनी सांगितले.
अमित काळे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यात जन्मलेले स्व. अजित पवार यांच्यासारखे कणखर नेतृत्व महाराष्ट्राला लाभले होते. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांच्याशी जवळचा संबंध आला. कामाचा माणूस म्हणून त्यांनी राज्यात वेगळी ओळख निर्माण केली होती. राजकारणाशी कोणताही संबंध नसलेले लोकही त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
विलास साठे यांनी स्व. अजित पवार यांचे अहिल्यानगर जिल्ह्याशी अतूट नाते असल्याचे सांगितले. त्यांचा जन्म देवळाली प्रवरा येथे झाला असल्याने जिल्ह्यातील विविध प्रश्‍न व परिस्थिती त्यांना चांगल्या प्रकारे परिचित होत्या. सुमेध गायकवाड यांनी स्व. पवार यांनी दिलेले संविधान भवन उभारणीचे आश्‍वासन आमदार संग्राम जगताप पूर्ण करतील, असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी विजय भांबळ, शनेश्र्वर पवार आणि राहुल आल्हाट यांनी मनोगत व्यक्त करत स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ आढाव यांनी केले. आभार सृजन भिंगारदिवे यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे