प्रशासकिय

अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्षमय जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी-प्रा. राम शिंदे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे आयोजित पालखी सोहळा व अभिवादन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 14 – आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्षमय जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे आयोजित पालखी सोहळा व अभिवादन कार्यक्रमात प्रा. शिंदे बोलत होते.
कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्रीराम पुंडे, सुनील वाघ, चिमणभाऊ डांगे, नानासाहेब कोपनर, अभिमन्यू सोनवणे, अविनाश शिंदे, पांडुरंग उबाळे, तेजस देवकाते आदी उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर भव्य राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी इच्छा होती. त्या अनुषंगाने चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ६८१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. या निधीतून भव्य राष्ट्रीय स्मारक, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची सचित्र माहिती देणारी विकासकामे करण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षांत ही कामे पूर्ण केली जातील. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने चौंडी येथे सुत गिरणी उभारणीसाठी ११८ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून पुढील वर्षी हे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष गिरणी सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीसाठीही शासनाने मान्यता दिली असून बहुभाषिक या चित्रपटाच्या निर्मितीसाठीच्या २१ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. चौंडीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास २०७ कोटी रुपयांतून करण्यात येत असून वर्षभरात रस्त्यांची कामे पूर्ण होतील. कुकडीचे पाणी सीना नदीमध्ये आणून १५० कोटी रुपयांच्या बुडीत बंधाऱ्याद्वारे स्मारकाच्या परिसरात पाणी पोहोचवण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यास केवळ १६ महिन्यांत यश मिळाल्याचे सांगत, त्यांच्याच नावाने अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.
आपल्या मंत्रीपदाच्या काळात १०० कोटी रुपयांत कृषी महाविद्यालय सुरू केले. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासनामार्फत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
इतिहास आपल्याला मार्गदर्शन करतो. त्यातून प्रेरणा घेऊन अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य पुढे नेण्याचे बळ या निमित्ताने मिळेल, असा विश्वास प्रा. शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, नानासाहेब कोपनर यांच्यासह इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमास चौंडी येथील ग्रामस्थांसह विविध जिल्ह्यांतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे