देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. १६-पारनेर तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात शुद्ध पिण्याचे पाणी तसेच पशुधनासाठी पुरेसे पाणी व चारा उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. टंचाई निवारणात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रती संवेदनशीलता ठेवून काम करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पारनेर येथे टंचाई परिस्थितीबाबत आयोजित तालुकास्तरीय शासकीय योजनांच्या अंमलबजावणी आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते.
यावेळी आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, टंचाईच्या काळात नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील कोणत्याही गावात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे. नागरिकांची गैरसोय व त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी पंचायत समिती स्तरावर वेळापत्रक निश्चित करून त्याप्रमाणे समन्यायाने पाणी वाटप करावे. तलाठी व ग्रामसेवकांनी पाणी वाटपाच्या वेळी गावात उपस्थित राहावे. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी पाणी वाटपावर बारकाईने लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांमधील अडथळे तातडीने दूर करण्यात यावेत. येत्या दोन-तीन दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करून सदर योजना कार्यान्वित करण्यात याव्यात. तालुक्यातील १६ गावांसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा तातडीने सुरू करून योजना कार्यान्वित करावी. तसेच कुकडी कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकरी, नागरिक व पशुधनाच्या गरजांचा विचार करून पाण्याचे प्रभावी नियोजन करण्यात यावे. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने अधिक समन्वयाने कार्य करावे. औद्योगिक वसाहतीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्यावेत. उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा