देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. २२ :– बकरी ईद हा सण धार्मिक परंपरा आणि सामाजिक सलोखा राखून, शांततामय वातावरणात साजरा करण्यात यावा. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून दक्षतेने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व प्राणी क्लेश प्रतिबंधक जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते.
बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त उमेश पाटील, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मुकुंद राजळे, अन्न व औषध निरीक्षक जी. बी. भोर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, सण उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांच्या वाहतुकीदरम्यान तसेच कत्तलीच्या प्रक्रियेदरम्यान प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी. विनापरवाना जनावरांची वाहतूक, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत कत्तल तसेच अस्वच्छता होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी संयुक्तपणे कार्यवाही करावी. बकरी ईदच्या निमित्ताने काही तालुक्यांमध्ये तात्पुरत्या कत्तलखान्यांची मागणी होऊ शकते. त्या अनुषंगाने आवश्यक परवानग्या, स्वच्छता आणि नियमांचे पालन याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
कत्तलखाने तसेच इतर ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणीय बाबींकडे दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांच्या भावना, धार्मिक परंपरा आणि सार्वजनिक आरोग्य यामध्ये समतोल राखत प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा