रिपाईचे मनपा कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा! राज्य सरकारने तात्काळ कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने महापालिका कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, जिल्हा कार्याध्यक्ष विलास साठे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक नगर तालुकाध्यक्ष आकाश बडेकर, नगर तालुका युवक सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, माजी सरपंच युवराज पाखरे, प्रदीप बनसोडे, सुधीर सोनवणे, प्रतीक केदारे, आयुष पवार आदी उपस्थित होते.
महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबीत असून, या प्रश्नासाठी महापालिका कर्मचारी सातत्याने संघर्ष करुन राज्य सरकारकडे मागणी करत आहे. या मागणीसाठी मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने महापालिके समोर उपोषण करुन कामबंद आंदोलन सुरु केले आहे. तर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने विविध प्रश्न व समस्यांसाठी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन सुरु आहे. या दोन्ही आंदोलनास रिपाईच्या शिष्टमंडळाने भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. तर राज्य सरकारकडे मनपा कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.