नगर शहरासह जिल्ह्यात ओबीसी समाज घटकांना काँग्रेसच्या झेंड्याखाली संघटित करणार – संजय झिंजे आ.थोरात, आ.पटोले, माळींच्या उपस्थितीत ओबीसी मेळाव्याचे आयोजन करणार

अहमदनगर दि. 3 जानेवारी (प्रतिनिधी) : ओबीसींचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भाजप सरकारने ओबीसींचा उपयोग केवळ राजकीय स्वार्थासाठी केला. नगर शहरासह जिल्ह्यातील ओबीसीमध्ये मोडणाऱ्या विविध समाज घटकांना एकत्रित करण्याचे काम काँग्रेसच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र करत त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या उपस्थितीत शहर व जिल्ह्यातील ओबीसी काँग्रेस विभागाच्या मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन शहर ओबीसी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांनी केले आहे.
ओबीसी काँग्रेस विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भिंगार येथील सोपानकाका साळुंखे यांची निवड झाल्याबद्दल नगर शहर ओबीसी काँग्रेस विभागाच्या वतीने त्यांचा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी झिंजे बोलत होते. साळुंखे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आहेत. त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्यावर आ. बाळासाहेब थोरात, ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून त्यांचा सन्मान केला असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मनपाचे माझी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक फैयाज शेख, माथाडी कामगार काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, महिला काँग्रेस उपाध्यक्ष जरीना पठाण, उपाध्यक्ष सुनीता भाकरे, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मीनाज सय्यद, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट, अशोक जावळे, युवक काँग्रेस सरचिटणीस आनंद जवंजाळ, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, अल्पसंख्यांक काँग्रेस विभाग शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, सचिव शंकर आव्हाड, काँग्रेस ग्रंथालय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुधीर लांडगे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, स्वप्निल सातव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
झिंजे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यामध्ये ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यात व शहरात ओबीसीची कार्यकारणी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुका कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी, शहर जिल्हा कार्यकारणी गठीत केली जात आहे. तसेच मनपा क्षेत्रात प्रभाग कार्यकारणी, ग्रामीण क्षेत्रात पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गट स्तरावर कार्यकारणी तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना पक्षाच्या ओबीसी विभागात काम करण्याची संधी मिळत आहे.