बनावट एनओसीने लष्करी हद्दीत बांधलेल्या अनाधिकृत इमारती तात्काळ पाडाव्या सामाजिक कार्यकर्ते भिंगारदिवे यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन

अहमदनगर दि.१९ नोव्हेंबर (प्रतिनिधी)- आर्मी स्टेशन हेडकॉर्टरची बनावट एनओसी घेऊन बांधण्यात आलेल्या उंच इमारती लष्कराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तात्काळ पाडाव्या व बनावट एनओसीच्या आधारे बांधकाम करणार्यांना सहआरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये काही दिवसापूर्वी आर्मीच्या बनावट एनओसी प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होऊन काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या आरोपींनी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लष्कराला धोका निर्माण होईल अशी कृत्य केली आहे. या आरोपींवर राजद्रोहोचे वाढीव कलम लावण्याची गरज आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी बनावट एनओसीचा वापर करून बांधकामे केले आहे, त्यांनापण यामध्ये सहआरोपी करून लवकरात लवकर अटक होणे अपेक्षित आहे.
बनावट एनओसीच्या आधारे लष्करी हद्दीत जे बांधकाम झाले, ते बांधकाम लष्कराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने धोक्याचे आहे. हे बांधकाम लष्कर हद्दीच्या जवळ आहे. या इमारतीच्या छतावर जावून लष्कराच्या सर्व परिसराची सहज माहिती घेतली जाऊ शकते. अजूनही आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या बनावट एनओसीचे मोठे रॅकेट कार्यरत असून, यामुळे अनेकांनी अनाधिकृत इमारती उभारल्या असल्याचा आरोप भिंगारदिवे यांनी केला आहे.
बनावट एनओसी घेऊन बांधण्यात आलेल्या उंच इमारती लष्कराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तात्काळ पाडाव्या, बनावट एनओसीच्या आधारे बांधकाम करणार्यांना सहआरोपी करावे, या प्रकरणातील तपासी अधिकारी बदलून हा तपास सीबीआयकडे द्यावा, या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भिंगारदिवे यांनी केली आहे.