देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : देवळाली प्रवरा दि.4 मार्च :
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना आकारण्यात येणारी पाणीपट्टी ही त्यांच्या आर्थिक समतेशी सुसंगत्व व व्यवहार्य असणे आवश्यक आहे. तथापि देवळाली प्रवरा नगरपरिषदेने २८ जानेवारी रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक २० अन्वये नागरिकांना विश्वासात न घेता व विरोधी गटातील सदस्यांचा विरोध ढवळून १८०० वरून थेट ३००० वाढविलेली पाणीपट्टी ही सद्यस्थितीत अवास्तव व जास्त असल्याबाबत नगरपरिषद या क्षेत्रातील नागरिकांकडून त्यास कडाडून विरोध केला जात आहे.. तसेच या निर्णया विरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
सदर पाणीपट्टीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक.. विशेषता, मध्यम व अल्प उत्पन्न गटावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून नगरपरिषदेच्या पाणीपट्टी वसुलीवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. तसेच अनेक नागरिकांकडून पाणीपट्टी भरण्यात अडचणी येणार असल्याने नगरपरिषदेची थकबाकी वाढण्याचा धोका त्यामुळे संभवतो.
नगरपरिषदेने पाणीपुरवठा वरील खर्च कमी करण्याच्या उपाययोजना करणेऐवजी प्रशासक कालावधीत पाणीपट्टी वाढविण्याचा ठराव झाल्याचे दाखवून नगरपरिषदेने नगरसेवकांची व नागरिकांची दिशाभूल केली आहे.. व, नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अवास्तव पाणीपट्टी वाढविण्याचा ठराव केला आहे.. तो आम्हाला व देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना मान्य नाही.
नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा सेवा ही मूलभूत गरज असल्याने ती नागरिकांना किफायतशीर व न्याय्य दरात उपलब्ध करून देणे नगरपरिषदेचे आद्य कर्तव्य आहे. याकरिता नगरपरिषदेच्या पाणीपट्टी वाढीच्या ठरावामध्ये पुनर्विचार करून नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने पाणीपट्टी दरात १८०० रुपयांवरून थेट ३००० रुपयांची केलेली अवाजवी वाढ रद्द करण्यासाठी ०६ मार्च २०२६ रोजी देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर सर्वपक्षीय धरणे आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीमधील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून पाणीपट्टी कमी करण्यासाठी नगर परिषदेला बाध्य करावे असे आवाहन सर्वपक्षीय पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा