प्रशासकिय

अवैध धंदे मोडून काढण्यासाठी लवकरच विशेष ‘हेल्पलाईन’; ओळख गुप्त ठेवणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील कोपरगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे व‌ गृहसंकुलाचे लोकार्पण

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :शिर्डी, दि. :-4 मार्च : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय मोडून काढण्याची आवश्यकता असून, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम करणे अपेक्षित आहे. नागरिकांमधील भीती दूर करून त्यांना थेट प्रशासनाशी जोडण्यासाठी लवकरच एक विशेष ‘हेल्पलाईन क्रमांक’ कार्यान्वित करण्यात येईल. याद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये नागरिकांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून प्रशासनामार्फत योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशा शब्दांत जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांना आश्वस्त केले.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ६४ निवासस्थानांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस दलासाठी अत्याधुनिक चार फॉरेन्सिक लॅब व्हॅनचे लोकार्पणही करण्यात आले. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेश परजणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, राज्य शासनाच्या धोरणानुसार पोलिसांच्या कल्याणासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यात आली असून, जिल्हा मुख्यालयात ३२२ निवासस्थानांचे काम सुरू आहे. तसेच कोपरगाव (४८) व पाथर्डी (५४) येथील निवासस्थानांचे काम पूर्ण झाले असून, राहाता व शिर्डी येथे अद्ययावत पोलीस ठाण्यांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय व समृद्धी महामार्गांमुळे वाढणारी अंमली पदार्थांची तस्करी व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढवणे अत्यावश्यक आहे. याकरिता ५०० अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी शासनाकडे नोंदवण्यात आली आहे.
गुन्हेगारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन मंडळामार्फत सर्व महाविद्यालयांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून, ग्रामपंचायतींनीही लोकसहभागातून आपापल्या गावांमध्ये सीसीटीव्ही बसवून २४ तास लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, गुन्ह्यांचा तपास वेगाने व्हावा आणि न्यायदानात विलंब होऊ नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर अत्याधुनिक ‘फॉरेन्सिक व्हॅन’ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याद्वारे घटनास्थळीच जलद तपासणी करणे शक्य होऊन तपासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार श्री. काळे म्हणाले की, तालुक्यातील अवैध धंदे व गावठी दारूविक्री यांसारख्या बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असून समाजात चुकीची माहिती पसरवून दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी.
कोपरगाव पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीमुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात पाच पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना गृह संकुलाच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या.
प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले, तर आभार पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे