म्हाडावर विश्वास ठेवा,पुढील तीन वर्षात तुमच्या घरांच्या चाव्या तुमच्या हातात असतील.”- डॉ.जितेंद्र आव्हाड.

मुंबई (प्रतिनिधी)
मला आठवत,
गृहनिर्माण खात्याची जबाबदारी,आदरणीय पवार साहेबांनी माझ्या खांद्यावर दिली आणि तिसऱ्याच दिवशी मी पत्राचाळीला भेट दिली होती.येथील रहिवासी बांधवांच्या समस्या आणि प्रश्न समजावून घेतले होते.
नंतरच्या काळात अनेक गोष्टी या दरम्यान घडल्या.या चाळीतल्या विविध समित्या,संघटना सातत्याने मला भेटायला येत राहिल्या.मी देखील त्यांना वेळोवेळी भेटत राहिलो.येथील लोकांचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा,यासाठी माझ्या खात्याचे देखील ताकदीने प्रयत्न सुरू केले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मुंबई येथील कार्यक्रमात बोलत होते.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले,
एकदा मुख्यमंत्री साहेबांनी मला एक विशेष सूचना पत्रा चाळ रहिवाश्यांच्या साठी केली होती.ते म्हणाले होते की,”जितेंद्र या पत्रा चाळ रहिवाश्यांच्या चेहऱ्यावर मला हास्य फुललेलं पहायचं आहे.”
अर्थात या मागे मंत्री महोदय श्री.सुभाष देसाई यांनी केलेला सातत्याचा पाठपुरावा होता,हे वेगळं सांगायला नको.आज मुख्यमंत्री साहेबांनी केलेली ती सूचना प्रत्यक्षात साकारते आहे,हे सांगताना माझी छाती अभिमानाने फुलून येते आहे.
या चाळीचा विषय समजावून घेताना काही गोष्टी लक्षात आल्या.अडथळे समजून आले.यानंतर हा विषय संपूर्ण गांभीर्याने सोडविण्यासाठी म्हाडाने दाखवलेली तत्परता तुम्हाला थोडक्यात सांगतो. सदर प्रश्न सुटावा यासाठी एक नव्हे,दोन नव्हे,तब्बल 48 बैठका आमच्या खात्याने घेतल्या आहेत.
प्रत्येक कॅबिनेट मीटिंग मध्ये हा विषय ताकदीने आम्ही वेळोवेळी मांडत राहिलो,आणि संपूर्ण महाविकास आघाडीचे सरकार यासाठी सातत्याने अनुकूल राहिले,हे विशेष.या कामात जबाबदारीने काम करणाऱ्या माझ्या शासकीय सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतली,त्याच मी इथ खुल्या मनाने कौतुक करतो.
थोडक्यात सांगतो,हा प्रश्न सुटावा यासाठी म्हाडाने जी कार्यतत्परता दाखवली,ते पाहता,जर Covid नसता तर हा प्रश्न मागेच सुटला असता,हे मी जाणीवपूर्वक सांगतो.
आज मी पूर्ण जबाबदारीने सांगतोय,
“आजवर जसा विश्वास तुम्ही म्हाडा वर ठेवला आहे,तसाच विश्वास म्हाडावर विश्वास ठेवा,पुढील 3 वर्षात तुमच्या घराच्या चाव्या तर तुमच्या हातात असतीलच,शिवाय आपले थकीत असणारे भाडे देखील आपल्याला लवकरात लवकर मिळेल,शिवाय येणाऱ्या 1 तारखेपासून आपले नियमित भाडे देखील वेळेवर मिळेल,असा मी शब्द या ठिकाणी देतो.
आज मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा या म्हाडा कडे आहेत.गृहनिर्माण मंत्री या नात्याने तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की,”येणाऱ्या काही वर्षात किमान लाखभर मराठी लोकांना त्यांच्या हक्काची घरे,ही मुंबईत मिळतील,यासाठी मी प्रयत्नशील असेन.
म्हाडा म्हणजे फक्त घर बांधणारी एक शासकीय संस्था नव्हे.माझा प्रयत्न असेल की म्हाडा ही एक माणुसकी जपणारी संस्था देखील असावी.कारण माणुसकीची ही भावनाच आपल्याला एकमेकांच्या अजून जवळ आणि शकते,असा माझा विश्वास आहे.
आणि या भावनेतूनच आज म्हाडाने,
> टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर ग्रस्त रुग्णांच्या करीता घरे देण्याचा निर्णय घेतलाय.
> शिवाय,कोकण आपत्ती आल्यानंतर तेथील तळये या गावाचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा देखील निर्णय म्हाडाने घेतला आहे.
> यासोबतच मध्य मुंबई मध्ये विद्यार्थ्यांची सोय व्हावी,या उदात्त हेतूने म्हाडा तब्बल 500 खोल्यांचे वसतिगृह देखील बांधत आहे.
> आणि त्याचवेळी “वर्किंग वूमन” साठी देखील आपल्या चाकोरी बाहेर जात ताडदेव येथे 500 खोल्यांचे प्रशस्त हॉस्टेल म्हाडा अंतर्गत बांधण्याचा निर्णय गृहनिर्माण खात्याने घेतला आहे.
> म्हाडा हॉस्पिटल देखील बांधत आहे.गोरेगाव येथे अडीच एकर परिसरात हा प्रकल्प लवकरच सुरू होईल.
म्हाडा आणि गृहनिर्माण खात्याने आपली कात टाकली आहे.येणाऱ्या काळात म्हाडा संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल,याचा मला विश्वास आहे.
पत्रा चाळवासियांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून समाधान वाटले.येथील रहिवासी बांधवांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होतेय.
आज हा प्रकल्प पूर्णत्वास जातोय.एक मोठ काम माझ्या कार्यकाळात यानिमित्ताने होत आहे,याच मला मोठ समाधान आहे.
या कार्यक्रमासाठी देशाचे नेते आणि माझे आराध्य दैवत आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार ,राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे ,प्रशासनावर जबर पकड असणारे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार ,महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात ,उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई ,गृहनिर्माण राज्यमंत्री श्री.सतेजजी पाटील,मुंबईचे पालकमंत्री श्री.अस्लमजी शेख,आ.विद्या ठाकूर,आ.श्री.विलास पोतनीस,आ.श्री.कपिल पाटील,खा.सौ.प्रियांका चतुर्वेदी,मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, गृहनिर्माण खात्याचे श्री.मिलिंद म्हैसकर,श्री.म्हसे आणि सर्व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.