देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. ७ एप्रिल – राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्षवेध’ योजनेअंतर्गत जिल्हास्तर प्रतिभा विकास केंद्रात प्रवेशासाठी निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेद्वारे खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा सुविधा, साहित्य, मार्गदर्शन व प्रोत्साहन उपलब्ध करून देत त्यांची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक खेळाडूंनी ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह निवड चाचणीस उपस्थित राहावे. ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत १२ एप्रिल २०२६ असून, अधिक माहितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, शूटिंग, रोईंग, सेलिंग, टेबल टेनिस व लॉन टेनिस अशा १२ क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली असून या पैकी जिल्ह्यात ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, रोईंग, टेबल टेनिस, शूटिंग व हॉकी या क्रीडा प्रकारांसाठी जिल्हास्तर प्रतिभा विकास केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
जिल्हास्तर निवड चाचण्या १३ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये ॲथलेटिक्ससाठी १३ एप्रिल रोजी पोलीस मुख्यालय मैदान, अहिल्यानगर; शूटिंगसाठी १३ एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुल, अहिल्यानगर; वेटलिफ्टिंगसाठी १३ एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुल; कुस्तीसाठी १३ एप्रिल रोजी त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, नेवासा फाटा येथे, तर हॉकीसाठी १५ एप्रिल रोजी प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर (ता. राहाता) येथे निवड चाचण्या घेण्यात येणार आहेत. या पाच खेळांच्या चाचणीतून २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
या निवड चाचण्यांसाठी २१ वर्षांच्या आतील (३१ डिसेंबर रोजी वय गणना) मुला-मुलींना सहभागाची संधी देण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडूंच्या शालेय/संघटनांच्या अधिकृत स्पर्धांमधील गत २ वर्षांच्या क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येईल. तसेच, संबंधित खेळाडू क्रीडा कौशल्य व शारीरिक तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र असणे आवश्यक आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना उच्चस्तरीय तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, स्पर्धांमध्ये सहभागासाठी आवश्यक खर्च, वैद्यकीय सुविधा तसेच क्रीडा पोषण आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही प्रशिक्षण केंद्रे जिल्हा क्रीडा अधिकारी, अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली कार्यान्वित केली जाणार आहेत.
इच्छुक खेळाडूंनी ahilyanagardso@gmail.com या ई-मेल पत्यावर आपले नाव, प्रमाणपत्र व संपर्क क्रमांक इत्यादी माहिती पाठवावी व आवश्यक कागदपत्रांसह निवड चाचणीस उपस्थित रहावे. ऑनलाइन नोंदणी करिता गुगल फॉर्म लिंक सोबत दिलेली असून दि. १२ एप्रिल २०२६ पर्यंत https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScmD1Ud08UhhwL7jN1GajPlWTv2mwkLkiKRXqSJEzR6rPQHWg/viewform?usp=publish-editor या लिंक वर खेळाडूंनी नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विशाल गर्जे (८३६९५३९०७७), संतोष वाबळे (७५८८१६९४९३) यांच्याशी संपर्क साधावा. चाचणीसाठी उपस्थित राहताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावीत, असेही कळविण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा