दोघांनी एकाच वेळेस क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली. दोघांचे प्रशिक्षक एकच होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनचे पदार्पण आधी झाले आणि कांबळी नंतर आला तरीसुद्धा त्याचा खेळ सचिनच्या तोडीस तोड होता. विशेषत्वाने त्याचा ऑफ ड्राईव्ह व स्क्वेअर ड्राईव अतिशय सुंदर. सर्वच डावखुऱ्या फलंदाजांचे स्क्वेअर ड्राईव्ह पाहत रहावे असेच असतात पण लारा आणि कांबळी यांचा मात्र अतिशय स्टायलिश आणि प्रेमात पडावा असा होता.
त्याकाळी क्रिकेट समीक्षक विनोद कांबळी हा क्रिकेट विश्वावर सचिनप्रमाणे मोठी छाप सोडून जाईल असा विश्वास व्यक्त करायचे. आमची पिढी तेव्हा कॉलेज विश्वात होती आणि स्वाभाविकच त्यामुळे क्रिकेट फार बारकाईने पाहिले जायचे.
आमच्या डोळ्यासमोर अचानक कांबळीचे करियर एका क्षणी कोसळाला सुरुवात झाली आणि बघता बघता तो नामशेष होऊन गेला. एकाच गुरुने संस्कार घडवलेल्या या दोन खेळाडूंच्या आयुष्याचे ग्राफ मात्र परस्परविरोधी दिशेला गेले.
गुणवत्ता, संधी व प्रशिक्षण सर्व समान पातळीवर मिळालेले असताना दोघांमध्ये 360° चा पडलेला फरक हा फक्त त्या दोघांनी निवडलेल्या विचारावर आधारित आहे.
त्यामुळे माझे ठाम मत आहे की आपण आपल्या मनावर सुद्धा प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. आपले चेतन मन विचार निर्माण करणे व त्यापैकी विचार निवडणे या दोन महत्त्वाच्या भूमिका पार पाडते.
आपले अवचेतन मन निवडलेला विचार तंतोतंत कृतीत आणण्याची भूमिका पार पाडते. आणि आपण तंतोतंत अमलात आणलेल्या कृती आपल्या आयुष्याला आकार देतात. त्या पलीकडे काहीही नाही. स्वर्गीय श्री रमाकांत आचरेकर यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे जे फुटेज आले आहेत ते पाहून विनोद कांबळी बद्दल फार वाईट वाटले.
पण हा आपल्या सर्वांसाठी एक जिवंत धडा आहे. मनावर सातत्याने काम करत राहिले पाहिजे. त्यासाठी मेडिटेशन, माईंड फुलनेस, विपश्यना, वाचन, लिखाण, जर्नलिंग यासारखी सर्व तंत्र कायम वापरली पाहिजेत. त्यासाठी दिवसातला काही वेळ राखीव ठेवला पाहिजे, मग दररोज अगदी दहा मिनिटे का असेना……
विनोदने त्याकाळी त्याच्या अल्प क्रिकेट कारकिर्दीत सुंदर खेळ करून जे आनंदाचे क्षण आमच्या पिढीच्या आयुष्यात निर्माण केले त्याबद्दल त्याचे आम्ही कायमच फॅन राहू!
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा