क्रिडा व मनोरंजन

सबका क्लब भिंगार स्पोर्ट क्लबचा वर्धापनदिन उत्साहात साजरा खेळाडूंसाठी करिअरच्या मुबलक संधी – वसंत राठोड

नगर दि. 1 फेब्रुवारी (प्रतिनिधी )- विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ खेळायला हवेत. त्यामुळे ताजेतवाने व शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबरच इतर अनेक फायदे मिळतात. शिक्षणाबरोबरच मैदानी खेळांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय, तसेच आंतरराज्य पातळीवर गोल्ड, सिल्वर व ब्राँझ पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंची देशाला गरज आहे. गुणवान खेळाडूंना शासन सेवेत रुजू करून घेते. सबका क्लब भिंगार स्पोर्ट क्लब मागील अनेक वर्षापासून कोच मेजर विठ्ठलराव काळे व क्लबचे सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतीही फी न आकारता खेळाडू घडवितात. आतापर्यंत अनेक खेळाडू त्यांनी घडविले असून, ही सेवा अविरतपणे सुरू आहे. याचा लाभ खेळाडूंनी घ्यावा. खेळाडूंसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते व छावणी परिषद उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी केले.
सबका क्लब भिंगार स्पोर्ट क्लबच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा, विभागीय, जिल्हास्तरीय व आंतरराज्य स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी श्री. राठोड बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य कैलासराव मोहिते, क्लबचे अध्यक्ष अरुण तनपुरे, आष्टी पंचायत समिती प्रशासनाधिकारी माधवी सोरटे, ‘स्नेहबंध’चे उद्धव शिंदे, कोच मेजर विठ्ठलराव काळे, शिवाजीराव बेरड, बाळासाहेब दळवी, भिंगार अर्बन बँक माळीवाडा शाखाप्रमुख संतोष मिसाळ, रमेश वाघमारे, संतोष खेडेकर, आंतरराष्ट्रीय धावपटू शंकर औरंगे, मंदाबाई भालेराव, शीतल लहारे, सुजाता काळे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
श्री. कैलासराव मोहिते म्हणाले की, सबका क्लब भिंगार स्पोर्ट क्लबच्या नावातच आपलेपणा आहे. माणुसकीच्या नात्यातून निवृत्तीनंतर मेजर विठ्ठलराव काळे यांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून या क्लबची स्थापना करून विनाशुल्क खेळाडू घडविण्याचा विडा उचलला, ही खेळाडूंसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अवघ्या दहा वर्षांत क्लबची लोकप्रियता राज्यभर पसरली. क्लबचे खेळाडू पोलीस, संरक्षण खात्यात, तसेच शासकीय सेवेत क्रीडा कोट्यातून रुजू झालेले आहेत. अवघ्या 6 वर्षांची मुले सुवर्णपदक विजेती आहेत, हे केवळ क्लबचे कोच मेजर विठ्ठलराव काळे यांच्या अथक परिश्रमामुळेच, असे ते म्हणाले.
यावेळी क्लबचे कोच मेजर विठ्ठलराव काळे यांच्या निःस्वार्थी सेवेबद्दल भिंगारमधील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी, तसेच नाट्य लघुपट चित्रपट लेखक सुनील राऊत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उद्धव शिंदे, माधवी सोरटे, संतोष मिसाळ यांनी सबका क्लब, भिंगारचे कौतुक केले. सूत्रसंचालन सुनील राऊत यांनी केले, तर आभार सुजाता काळे यांनी मानले. पाहुण्यांचे स्वागत आंतरराष्ट्रीय धावपटू शंकर औरंगे यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे