देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. ७ एप्रिल : जिल्ह्यात दि. ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ विविध प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी केले आहे.
भारतीय संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त, महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त, तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष व संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, दि. ८ एप्रिल रोजी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची प्रत प्रत्येक कुटुंबास वितरित करण्यात येणार असून सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येईल. दि. ९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, महाड चवदार तळे सत्याग्रहावर तसेच मानवी हक्कांवर व्याख्याने आयोजित करण्यात येतील. यासोबतच संत गाडगे महाराज यांच्या कार्यावर आधारित वक्तृत्व, निबंध व लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन केले जाईल. याच दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल.
दि. १० एप्रिल रोजी समतादूतांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात पथनाट्याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच ‘मार्जिन मनी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येईल.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. ११ एप्रिल रोजी जिल्ह्यात विविध स्तरांवर त्यांच्या सामाजिक कार्याचा जागर करणारे कार्यक्रम होणार आहेत. दि. १२ एप्रिल रोजी ‘संविधान जागर’ उपक्रमांतर्गत संविधान निर्मिती, मूलभूत अधिकार व कर्तव्ये यावर व्याख्याने आयोजित करण्यात येतील. तसेच महिला मेळाव्याच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली जाईल.
दि. १३ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रबोधन शिबिर, विद्यार्थ्यांसाठी रक्तदान शिबिर, तसेच वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. याच दिवशी जात पडताळणी कार्यालयामार्फत ऑनलाइन वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी, दि. १४ एप्रिल रोजी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल. यानिमित्त शेतकऱ्यांसाठी दादासाहेब गायकवाड सबलीकरण मेळावा, तसेच महाड चवदार तळे सत्याग्रहावर व्याख्याने आयोजित करण्यात येऊन सप्ताहाचा समारोप होईल.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा