पदाधिकारी व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयातून व एकत्रितपणे काम करत “शासन आपल्या दारी” कार्यक्रम यशस्वी करावा- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर दि. 8 ऑगस्ट (प्रतिनिधी) शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी “शासन आपल्या दारी” हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. शिर्डी येथे 11 ऑगस्ट, 2023 रोजी आयोजित करण्यात आलेला “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम पदाधिकारी व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयातून व एकत्रितपणे काम करत यशस्वी करण्याचे आवाहन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.३० हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमास येता यावे यासाठी ६०० पेक्षा अधिक एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी गावनिहाय रूटप्लॅन, लाभार्थी वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचतील यादृष्टीने नियोजन करावे. कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्त्यांची संख्या अधिक असल्याने आरोग्याच्यादृष्टीने आरोग्य पथक, रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात यावी. तालुकास्तरावर नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी दिले.
राज्यात पहिल्यांदाच महसूल दिनाऐवजी महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. विशेषतः महाविद्यालयातून कार्यक्रमांचे आयोजन करत योजनांची माहिती विध्यार्थ्यांमार्फत गावोगावी पोहोचविण्यात मोलाची मदत झाली. सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रमातुन माजी सैनिकांच्या समस्यांची सोडवणुक करण्यात यश आले. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुकही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.
आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम तसेच साक्षरता निर्माणासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी, मेरा देश उपक्रमाची घोषणा केली असून जिल्ह्यात हा उपक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यासाठी याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” हा उपक्रमही राबविण्यात येतअसुन या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने सहभाग घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.
बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील ईक्युजे कोर्टच्या डिजिटल बोर्डचा शुभारंभ, पक्षकार व वकील यांच्या प्रतिक्षालयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.