राजकिय

अकार्यक्षम राष्ट्रवादीने नौटंकी करण्या ऐवजी मनपा सत्तेतून पायउतार व्हावे : किरण काळे त्यांची आंदोलने जनतेसाठी नव्हे तर ठेकेदार असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आगामी काळात मनपावर काँग्रेसचाच विकासाचा झेंडा फडकणार

अहमदनगर दि. ८ ऑगस्ट (प्रतिनिधी) नगरमधील जवळपास सर्वच भागातील रस्ते भ्रष्टाचार, निकृष्ट कामांमुळे गायब झाले आहेत. नागरिकांना आपण नक्की एखाद्या शहरात राहतोय की डोंगरावर, टेकडीवर असा प्रश्न पडला आहे. हीच दयनीय अवस्था पिण्याचे पाणी, कचरा संकलन, आरोग्य अशा सर्वच बाबींबद्दल आहे. हे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी ही मनपात सत्तेत असणाऱ्या पक्षांची आहे. मनपा सत्तेचा शंभर टक्के रिमोट कंट्रोल असणाऱ्या तसेच उपमहापौर, स्थायी समिती सभापती याच बरोबर सत्तेत असूनही विरोधी पक्षनेता असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची मनपातील आंदोलने ही नौटंकी असून त्या ऐवजी आपली अकार्यक्षमता मान्य करून त्यांनी तात्काळ सत्तेतून पायउतार व्हावे, असा टोला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लगावला आहे.

काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी काळात जनतेच्या मनातील काँग्रेसचाच विकासाचा झेंडा मनपावर फडकेल असा विश्वास काळेंनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काळे म्हणाले की, राष्ट्रवादीची सत्तेतील कामगिरी ही कार्यसम्राट वाटावी अशी नसून शतप्रतिशत अकार्यक्षमता आहे. मागील साडेचार वर्षांच्या काळात आधी भाजप बरोबर त्यानंतर शिवसेनेबरोबर ते सत्तेत आहेत. मनपाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. कायम सत्तेत असून देखील कोणताही प्रश्न ते सोडवू शकलेले नाहीत. शहरात शिवसेनेबरोबर सत्ता तर राज्यात व देशात तथाकथित महाबलाढ्य भाजपबरोबर ते सत्तेत आहेत. काँग्रेसने खड्ड्यांच्या व दर्जेदार रस्त्यांच्या प्रश्नासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन केले.

मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात याच राष्ट्रवादीच्या शहर लोकप्रतिनिधींनी शहर विकासाच्या दृष्टीने साधा ब्र सुद्धा काढला नाही. वस्तुस्थितीमध्ये, मनपा अधिकारी, विविध विभागाचे कर्मचारी राष्ट्रवादीच्या मागणीला केराची टोपली दाखवतात. कोणी त्यांचे ऐकत नाही. कारण आंदोलनातील सहभागी होणारे त्यांचे अनेक कार्यकर्ते हे मनपाचे विविध विभागातील कामांचे ठेकेदार, लाभार्थी आहेत. हे कार्यकर्ते निकृष्ट कामे करून नगरकरांना वेठीस धरतात. यांची बिल निघायला विलंब झाला की हे मनपात येऊन आंदोलन करण्याची नौटंकी करतात. त्यामुळे यांची आंदोलने ही जनतेसाठी नसून कार्यकर्ते असणाऱ्या ठेकेदारांची बिलं लाटण्यासाठीची आहेत, असा घाणाघात काळे यांनी केला आहे.

काळे पुढे म्हणाले की, शहर, राज्य, देशात राष्ट्रवादीची सत्ता असून देखील शहराला विकासापासून वंचित राहावे लागले आहे. सत्तेतील राष्ट्रवादीचाच मनपात विरोधी पक्षनेता आहे. वास्तविक पाहता सत्ताधाऱ्यांचाच विरोधी पक्ष नेता कधी नसतो. सर्वात मोठा विरोधी पक्ष असणारा भाजप हे पद मिळविण्यासाठी कधी आग्रही दिसला नाही. शहरातील भाजप, राष्ट्रवादी युतीचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वीच संपला असून देखील भाजपला राष्ट्रवादी बरोबर राज्यात सत्तेत असल्यामुळे या पदामध्ये तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यामध्ये रस नाही. त्यामुळे जन प्रश्नांवर आवाज उठवणारा नगरकरांच्या मनातील खरा विरोधी पक्ष हा काँग्रेसच असल्याचा दावा या निमित्ताने पुन्हा एकदा काळे यांनी केला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे