महिलांसाठी मोफत, स्वच्छ व सुरक्षित स्वच्छता गृह मनपा कधी देणार ? – किरण काळेंचा सवाल ; महिला काँग्रेस शहरात उभारणार “राईट टू पी” चळवळ, ५१ मुताऱ्यांसाठी मनपाकडे करणार पाठपुरावा सुनिताताई भाकरेंनी महिला कार्यकर्त्यांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर दि. ०७ ऑगस्ट(प्रतिनिधी) : बाजारपेठ असो की सावेडी, केडगाव, बोल्हेगाव, कल्याण रोड सारखा अन्य उपनगरांचा परिसर. कुठेही महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता गृह उपलब्ध नाहीत. अपवादाने एखादी असलीच तर ती एवढी घाणेरडी असते की यामुळे आजाराचा प्रादुर्भाव त्यातून होतो. आमच्या पुरुषांचे काय, कुठेही सोयीस्कररित्या मोकळं होता येतं. मात्र आमच्या माता, भगिनींची यामुळे मोठी कुचुबना होते, असे म्हणत महिलांसाठी मोफत, स्वच्छ व सुरक्षित स्वच्छता गृह मनपा कधी देणार आहे, असा संतप्त सवाल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई भाकरेंनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये शिवनेरी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना काळे बोलत होते. भाकरेंसह ललिता कोल्हे, अर्चना त्रिभुवन, सोनाली भाकरे, रिबेका वाघमारे, सुशिलाबाई भाकरे, केसरबाई गायकवाड, आरती भाकरे, महिमा जाधव, अर्चना भाकरे, स्वाती जाधव, छाया भाकरे, साक्षी भाकरे आदींसह महिलांनी मोठ्या संख्येने यावेळी महिला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, ब्लॉक अध्यक्ष पूनमताई वनंम, महिला रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या शहर जिल्हाध्यक्ष राणीताई पंडित, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, सुनील क्षेत्रे, आकाश अल्हाट, प्रणव मकासरे सोफियान रंगरेज, अमोल गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
सुनिता ताई भाकरे म्हणाल्या की, आम्ही महिला बाजारपेठेत खरेदीसाठी मुलांच्या शालेय कामासाठी तसेच घरगुती घरातील अन्य कामासाठी घरातून बाहेर पडलो की तासंतास मोठ्या काळासाठी घराबाहेर राहावे लागते मात्र या काळात महिलांना लघु शंकेसाठी मनपाच्या वतीने सादर स्वच्छता गृह उपलब्ध असू नये. ही आम्हा महिलांना प्रचंड मानसिक त्रास देणारी बाब आहे.
उषाताई भगत म्हणाल्या की, शहराच्या प्रत्येक भागात मुबलक संख्येने उपलब्ध असणारे मोफत, स्वच्छ व सुरक्षित मुताऱ्या हा महिलांचा अधिकार आहे. यापूर्वी शहरात अनेक वर्ष नगरपरिषद आणि त्यानंतर सुमारे दोन दशकांपासून मनपा अस्तित्वात आली आहे. शहराला अनेक महापौर मिळाले. त्यात अनेक महिला महापौर, महिला नगरसेविका देखील झाल्या. तरी महिलांच्या स्वच्छता गृह करण्यासाठी ना मनपाने कधी पावले उचलली ना कोणत्याही शहर लोकप्रतिनिधी, नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेतला, महासभेत कोणीही यासाठी साधा ब्र देखील नाही काढला, अशी खेदाची भावना भगत यांनी व्यक्त केली.
“राईट टू पी” अभियान राबविणार :
शहरातील महिलांची यामुळे होणारी मानसिक व शारीरिक कुचंबणा दूर व्हावी यासाठी महिला काँग्रेसच्यावतीने किरण काळे यांच्या संकल्पनेतून “राईट टू पी” अभियान राबविणार असून या माध्यमातून स्वाक्षरी मोहिम, मनपाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देणे, महिलांमध्ये जनजागृती करणे, महाविद्यालयांमध्ये युवतींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात महिला काँग्रेसने हाती घेतले असल्याची माहिती पूनमताई वनंम, राणीताई पंडित यांनी दिली आहे. महिलांच्या या ज्वलंत प्रश्नावर अशा प्रकारचे अभियान राबविणारा काँग्रेस हा शहरातील पहिला राजकीय पक्ष म्हणून पुढे आला आहे.
काय आहे “राईट टू पी” :
महिलांना शहरात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मोफत, स्वच्छ, सुरक्षित मुताऱ्या सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध नाहीत. महिलांच्या हायजिन व आरोग्याच्या दृष्टीने त्या त्यांना देणे ही मनपाची जबाबदारी असून महिलांचा तो अधिकार आहे. शहरातील लाखो महिला, युवतींना हा अधिकार मिळवून देण्यासाठी शहर महिला काँग्रेसने हे अभियान हाती घ्यायचे ठरवले आहे. मुख्य बाजारपेठेसह शहराच्या १७ प्रभागांमध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किमान ३ अशा एकूण ५१ ठिकाणी किमान १० सीटच्या उभारण्याकरिता महिला काँग्रेस मनपाकडे पाठपुरावा करणार आहे. यासाठी संपूर्ण शहराचे महिला काँग्रेस कार्यकर्त्या सर्व्हेक्षण करणार असून काही जागा मनपा प्रशासनाला सुचविणार असल्याची माहिती उषाताई भगत, सूनिताताई भाकरे यांनी दिली आहे.