केंद्रीय मंत्री रामदास आठवले व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत शिबीर उद्या लोणी येथे ७२० दिव्यांगाना सहाय्यक उपकरणांचे होणार वाटप

शिर्डी, दि.२६ जून (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या एडीप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७२० दिव्यांगाना सहाय्यक उपकरणांचे २७ जून रोजी लोणी येथे मोफत वाटप करण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते व महसूल, पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सकाळी साडेदहा वाजता शिवकांता लॉन्स, लोणी येथे हा कार्यक्रम होणार आहे.
अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून केंद्र सरकारच्या एडिप योजनेच्या माध्यमातून जिल्हयात १२ दिव्यांग तपासणी शिबिर हे डॉ.विखे पाटील मेडिकल फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने २०२२ मध्ये घेण्यात येवून यात ७१४७ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यातील ७२० दिव्यांग व्यक्तींना प्रातिनिधिक स्वरूपात साहित्य वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित दिव्यांग व्यक्तींना तालुका स्तरावर वाटप शिबिर घेऊन साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. असे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी सांगितले आहे.