राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर आवश्यक समाजकार्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात निघाला सूर

अहमदनगर, दि.26 जुन (प्रतिनिधी) – राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजा आणि तत्वज्ञ होते. लोककल्याणाचा त्यांनी कायम पुरस्कार केला आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी केली. आजच्या काळात त्यांच्या विचारांचा जागर महत्वाचा असल्याचा सूर समाजकार्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमातून निघाला.
सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग व समाजकार्य महाविद्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजकार्य महाविद्यालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, खासेराव शितोळे, आनंद शितोळे, सुभाष सोनेने, संजय खामकर, सुरेश पठारे, राहुल गांगुर्डे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत व व्याख्याते अनंत शितोळे म्हणाले की, सामान्य माणूस केंद्रीभूत ठेवून काम करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. लोकांसाठी कार्य करणाऱ्या अशा लोकपुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास आजच्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे स्मरण या दिवशी करणे आवश्यक आहे. त्यांनी त्या काळी वैचारिक प्रबोधनाचा वारसा दिला. सर्वधर्मसमभावाची शिकवण केवळ सांगितली नाही, तर तो विचार अंमलात आणला. विद्यार्थ्यांनी वसतीगृह सुरु करणे असो की, मागासवर्गीय घटकांच्या उन्नतीसाठीचे निर्णय असो, त्यांनी परिणामांची पर्वा न करता सामाजिक न्यायाचे निर्णय घेतले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त राधाकिसन देवढे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांचा जयंतीदिवस हा दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजर्षी शाहू महाराजांनी लोकोपयोगी उपक्रम राबवत बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. वसतीगृह सुरु करण्याची संकल्पना मांडत त्याला मूर्त स्वरुप देण्याचे कार्य केले. राजर्षी शाहू महाराजांच्या विचसारांचा वारसा पुढे नेत त्यांना अभिप्रेत असे वर्तन ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमासाठी विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत आदींची उपस्थिती होती.
*समता दिंडीस उत्स्फुर्त प्रतिसाद* – राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्से शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या प्रांगणातुन सुरु झालेली ही समता दिंडी समाजकार्य महाविद्यालय येथे विसर्जित करण्यात आली. या दिंडीस शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.