विद्यार्थी दशेत खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व , खेळातून उज्ज्वल संधी – कुलगुरू डॉ. यु.डी. चव्हाण समाज कल्याण विभाग, नाशिक विभागीय कला व क्रीडा अविष्कार महोत्सव उद्घाटन

*अहमदनगर, दि.०९(प्रतिनिधी) – विद्यार्थी दशेमध्ये खेळास अनन्यसाधारण महत्त्व असून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांचा परिपूर्ण उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.यु.डी. चव्हाण यांनी आज येथे केले.
समाज कल्याण विभागाच्या नाशिक विभागीय स्तरावरील कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे आयोजन राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या क्रीडा भवनात करण्यात आले हाते. या महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू श्री.चव्हाण यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी समाजकल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रमोद लहाळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ. महावीरसिंग चव्हाण, समाज कल्याण विभागाचे अहमदनगर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, अहमदनगर येथील (वेटलिफ्टिंग) आंतरराष्ट्रीय खेळाडू कोमल वाळके, जळगाव समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, नाशिक जिल्हा सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, लेखाधिकारी श्री राहुल गांगर्डे, कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ.दिलीप गायकवाड व जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
कुलगुरू श्री.चव्हाण म्हणाले, समाजकल्याण विभागाने कला व क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून राबवलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे शासनाच्या शाळांमधून निश्चितच चांगले खेळाडू घडण्यास मदत होणार आहे. खेळातून तरुणांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले कला व क्रीडा क्षेत्रातील गुण विकसित करून आपल्या संस्थेचे समाजाचे राज्याचे उद्देशाचे नावलौकिक करावा.
समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत आज रोजी नाशिक विभागाच्या स्पर्धा राहुरी येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत नाशिक विभागातील नाशिक,जळगाव,धुळे,नंदुरबार अहमदनगर जिल्ह्यातील 400 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात सहभाग घेतला होता. राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे विविध कलाशिक्षक यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली होती. या स्पर्धांचा यशस्वी आयोजनासाठी नाशिक विभागातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच विविध आश्रम शाळांचे शिक्षक ,कर्मचारी व कलाशिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.