अहमदनगर येथे समता पर्वाची संविधान जागर रॅलीने सुरुवात रॅलीस विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

अहमदनगर, 26 नोव्हेंबर – सहायक आयुक्त समाजकल्याण व जिल्हा समाजकल्याण कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ‘समता पर्व’ साजरे केले जात असून याची सुरुवात संविधान जागर रॅलीने करण्यात आली.
शहरातील मार्केटयार्ड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कयर पाटील, नाशिक येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाचे समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी मनोजकुमार ससे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
मार्केट यार्ड येथून सुरुवात झालेली रॅली महात्मा जोतिबा फुले पुतळा, माळीवाडा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, बस स्टँड मार्गे जाऊन जिल्हा परिषद आवारात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे विसर्जित करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषेदेच्या सभागृहात भारताच्या संविधान उद्दीशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान दिनाच्या निमित्ताने हसन सय्यद यांचे व्याख्यानही यावेळी संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिक्षण विस्तार अधिकारी के.आर.ढवळे यांनी केले तर आभार समाजकल्याण निरीक्षक संगीता चितळे यांनी मानले. कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनीसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.